पुढच्या महिन्यात सुरु होऊ शकते स्वदेशी Covaxin लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी


नवी दिल्ली – पुढच्या महिन्यात स्वदेशी कोरोना प्रतिबंधक Covaxin लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू होऊ शकते. ड्रग रेग्यूलेटरकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकला परवानगी मिळाली आहे. मंगळवारी DCGI च्या तज्ज्ञांची एक बैठक झाली. लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीसाठी या बैठकीत परवानगी देण्यात आली. प्रोटोकॉल्सबाबत DCGI ने संशोधन केले होते. भारतात २५ हजारांपेक्षा जास्त लोक या लसीच्या चाचणीसाठी सहभागी होण्याची शक्यता आहे. २८ दिवसांच्या अंतरावर स्वयंसेवकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या लसीच्या चाचण्यांमध्ये आशेचा किरण दिसला आहे. कोवॅक्सिन ही पहिली स्वदेशी कोरोना लस असून इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ज्ञांनी मिळून ही लस तयार केली आहे.

५ ऑक्टोबरला या लसीची कमिटी मीटिंग झाली होती. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील प्रोटोकॉल्स त्यात पुन्हा जमा करण्यास सांगितले होते. कमिटीने दिलेल्या माहितीनुसा तिसऱ्या टप्प्प्यातील रचना आणि मांडणी ही समाधानकारक होती. सुरूवातीला सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटीच्या माहितीच्या आधारे दुसऱ्या टप्प्यात डोज तयार करता येतील त्यासाठी कमिटी फर्मकडून माहिती मागवण्यात आली होती.

भारत बायोटेकच्या प्लॅननुसार दिल्लीव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि आसाममध्ये कोवॅक्सिनची शेवटच्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. फेब्रुवारीपर्यंत शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम दिसून येतील अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. त्यानंतर लसीच्या वितरणाची परवागनी घेण्यासाठी निवेदन दिले जाईल. आपल्या कोरोना लसीत भारत बायोटेकने Alhydroxiquim-II नावाचे कंपाऊड जोडले असल्यामुळे लसीचा परिणाम अधिक चांगला दिसून येण्यासाठी मदत होईल. तसेच व्हायरसच्या संक्रमणापासून दीर्घकाळ सुरक्षा मिळवता येऊ शकते. ही लस दिल्यानंतर शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

भारतात कोवॅक्सिन व्यतिरिक्त दोन कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. ऑक्सफोर्ड आणि एक्स्ट्राजेनका यांच्यासह सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने भागिदारी केली आहे. कोविशिल्डचे परिक्षण कंपनीने सुरू केले आहे. याव्यतिरिक्त झायडल कॅडींला ही कंपनीही लस तयार करण्यात सगळ्यात पुढे आहे. अन्य कंपन्याही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.