शिवतीर्थावरील भव्य दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा यंदा खंडित


मुंबई: देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होण्याची शक्यता असल्यामुळे शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरु आहे. या माहितीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. राज्याची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधने कायम असल्यामुळे शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही अंशी अनलॉक केले असले तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नसल्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचे स्वरुप काय असावे? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु आहे. मेळाव्याचे व्यासपीठ स्मारकाच्या सभागृहात उभे करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण लाईव्ह प्रसारित केले जाईल, अशी सूचना मांडण्यात आली. तर पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधींपैकी अगदी मोजक्या व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल अशीही शक्यता आहे.