ओवेसींचे आदित्यनाथांना ओपन चॅलेंज; २४ तासांत सिद्ध करा तुम्ही ‘योगी’ आहात


लखनौ – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही दिवसातच पार पडणार आहे. पण तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रचार रंगात आला आहे. त्याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. त्याचदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल जमुई मतदारसंघात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर टीका केली होती. पाकिस्तानची ओवेसी आणि राहुल गांधी प्रशंसा करत असल्याचा योगींनी केला होता. त्याला आता ओवेसींनी प्रत्युत्तर देत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

ओवेसी योगींना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना मी आव्हान देतो की, २४ तासांत त्यांनी ते खरे योगी असल्याचे पुरावे द्यावेत. वैफल्यग्रस्ततेतून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. पाकिस्तानमध्ये मी गेलो होतो आणि मी तिथे भारतीय लोकशाहीवर बोललो होतो, हे त्यांना माहीत नाही का, असा सवाल ओवेसींनी विचारला.

जमुई येथील भाजपा उमेदवार श्रेयसी सिंह यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली होती. मतदारांना संबोधित करताना त्यावेळी योगी म्हणाले होते की, राहुल गांधी आणि ओवेसी यांच्याकडून वारंवार पाकिस्तानचे कौतुक केले जात आहे. या दोघांकडून देशहिताची कल्पना तुम्ही करू शकता का. देशाचे हित हे दोघे साधणार का. देशाचा शत्रू असलेला देश जो भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत आहे. अशा देशाच्या हिताची गोष्ट करणाऱ्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल? तसेच राहुल गांधी आणि ओवेसी यांना काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर त्रास झाल्याचेही दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.