ज्या पक्षात खडसेंनी प्रवेश केला त्यांच्याच नेत्यांनी केली होती त्यांच्या राजीनाम्याची मागणी


मुंबई : राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा एकनाथ खडसे यांचा निर्णय हा भाजपपेक्षा खडसेंसाठी अधिक दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी दिली. ते म्हणाले, त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आणि त्यांना पक्षानेही खूप काही दिले. मंत्रिमंडळातील अर्धी खाती एकेकाळी त्यांच्याकडे होती. त्यांच्या राजीनाम्यावरच नाही तर पक्षात नेहमीच चिंतन हे केलेच जाते.

त्यांचे पक्षात कोणीही दुश्मन नव्हते. काही केसेस त्यांच्या संदर्भात आहेत, त्या प्रलंबित असतानाच त्यांना काही दिले असते तर माध्यमांनीच टीका केली असती. ज्या पक्षात आज ते जात आहेत या प्रकरणांमध्ये त्या पक्षाच्या नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. ते आमचे मित्र आहेत, दिल्याघरी सुखी राहावे, असेही दानवे म्हणाले. माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, खडसेंना जी किंमत भाजपमध्ये होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. त्यांना घेतलेल्या निर्णयाचा निश्चितच पश्चाताप होईल.