कंगनाने पुन्हा एकदा उडवली मुंबई पोलिसांची खिल्ली


मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच नाही तर तिच्या विरोधात होणाऱ्या कायदेशीर कारवाईसाठीही २०२० हे वर्ष लक्षात ठेवले जाईल. शेतकऱ्यांचा अपमान केल्यामुळे आधीच कर्नाटकमध्ये FIR दाखल झालेल्या कंगनाविरोधात आता धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांनी याच प्रकरणी कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेलला समन्स पाठवले आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी दोघींना बोलवण्यात आले आहे.


कंगनाने आता मुंबई पोलिसांच्या या समन्सवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने नेहमीप्रमाणे मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली आहे. मुंबई पोलिसांना तिने पप्पूप्रो सेना असे म्हटले आहे. तिने यासंदर्भात एक ट्विट केले असून आपल्या ट्विटमध्ये म्हणते, किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन. मुंबई पोलिसांना कंगनाचे पप्पूप्रो म्हणणे नव्या वादाला कारण बनू शकते. तिने याआधी सोनिया सेनासारख्या शब्दांचा वापर केला होता.