विधानसभा निवडणुकीत माझा जाणूनबुजून पराभव करण्यात आला; रोहिणी खडसेंनी केली भाजप सोडण्याची घोषणा


जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

तत्पूर्वी आपल्या भावना व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, 40 वर्ष ज्या व्यक्तीने पक्षनिष्ठेने काम केले त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणे स्वाभाविक आहे. नाथाभाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, पण सतत दुय्यम वागणूक त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे.