एकनाथ खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाला सोडावे लागणार आपले मंत्रीपद?


मुंबई – भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत त्यांना योग्य ते स्थान दिले जाईल. एकनाथ खडसे यांनी गेल्या ४० वर्षापासून राज्यात भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रवादीत खडसेंना घेतल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळणार आहे. पण एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना प्रवेश दिल्यानंतर मंत्रिमंडळात त्यांना घेणार असल्याची चर्चा आहे. पण राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला त्यासाठी राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादीत सध्यातरी जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे. कृषीमंत्री एकनाथ खडसेंना बनवण्यात येईल, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्यासाठी खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री असल्यामुळे हे पद एकनाथ खडसेंना देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरे खाते द्यावे लागणार आहे.

राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करमुसे प्रकरणात गंभीर आरोप असल्यामुळे ते वादात सापडले. त्यामुळे मंत्रिपदावरून जितेंद्र आव्हाड यांना हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.