एकनाथ खडसेंचे पुन्हा फडणवीस यांच्यासह थेट मोदी-शहांवर शरसंधान


जळगाव: भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाच्या सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खडसे प्रवेश करतील. त्याआधी खडसेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले. माझ्या हातून नेमका कोणता गुन्हा घडला, पक्षातील इतर नेत्यांवर देखील आरोप झालेले असताना केवळ माझाच राजीनाम का घेतला. त्याचबरोबर मला पक्षात वेगळी वागणूक का दिली असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

राज्यात युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. पण केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पण इतरांना क्लीन चीट देण्यात आली. इतरांसाठी आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. फौजदारी गुन्हे असलेल्या, इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आले. पण ४० वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या नेत्यावर सातत्याने अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांना लक्ष्य केले.

माझ्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी मी पक्षश्रेष्ठींची देखील भेट घेतली. पण माझे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेतले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गाऱ्हाणे मांडले. देवेंद्र यांना तुम्ही घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असे सांगण्यात आले. मी देवेंद्रजींना हा निरोप दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असे म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवल्याचे खडसे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व फारच सक्षम असल्यामुळेच भाजपने राज्यातील सत्ता गमावली, असा उपरोधिक टोलाही खडसेंनी लगावला. आमच्याकडे २०१४ मध्ये पैसा, साधने नव्हती. तरीही विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसतानाही आम्ही १२३ जागा जिंकलो. पण २०१९ मध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना, शिवसेनेसोबत युती असतानाही १०५ जागांवर आलो. मी पुन्हा येईन देवेंद्रजी म्हणत होते. हा अहंकार लोकांना आवडला नाही. त्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ म्हणायला हवे होते, असे खडसे म्हणाले.