भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली खतरनाक INS Kavaratti युद्धनौका


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केल्यानंतर भारतीय लष्कराची देखील स्वदेशी शस्त्रास्त्रांकडे ओढ वाढू लागली आहे. त्यातच आज 90 टक्के स्वदेशी उपकरणे लावलेली खतरनाक युद्धनौका भारतीय नौदलाला मिळाली आहे. शत्रुंच्या पाणबुड्यांसाठी ही युद्धनौका कर्दनकाळ ठरणार आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट- 28 अंतर्गत बनविण्यात आली असून आज विशाखापट्टनममध्ये ही युद्धनौका लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी नौदलाकडे सोपविली आहे.

चार स्टील्थ युद्धनौका प्रोजेक्ट 28 नुसार बनविण्यात आल्या आहेत. यापैकी तीन युद्धनौका याआधीच देशसेवेत आहेत. या श्रेणीतली ही चौथी युद्धनौका असून तिचे नाव आयएनएस कवरत्ती असे आहे. महत्वाचे म्हणजे ही नौका भारतीय नौदलाच्या अभियंत्यांनीच डिझाईन केली आहे. 2003 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. INS कमोर्टा (2014), INS कदमत (2016), INS किल्टन (2017) या तीन युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आहेत.


विशेष म्हणजे युद्धनौकेवरील 90 टक्के उपकरणे ही स्वदेशी बनावटीची असून कार्बन कंपोझिटचा वापर या युद्धनौकेच्या बांधणीमध्ये करण्यात आला आहे. हे नौदलाला मिळालेले मोठे यश आहे. भारतीय नौदलाच्या नौदल डिझाईन महानिदेशालयने (डीएनडी) आयएनएस कवरत्तीचे डिझाईन तयार केले आहे. तर कोलकाता गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्सने या नौकेची बांधणी केली आहे.

पाणबुड्य़ांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यामध्ये आयएनएस कवरत्ती सक्षम आहे. यासाठी स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि सेन्सर लावण्यात आले आहेत. पाणबुड्यांविरोधात मोहिम सुरु असताना स्वत:चा बचाव करणे आणि लांब पल्ल्याच्या मोहिमांना यशस्वी पूर्ण करणे ही तिची खासियत आहे. एकेकाळी भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या मिसाईलने युक्त अशा युद्धनौकेवरून कवरत्ती हे नाव ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या तावडीतून बांग्लादेशला सोडविण्याच्या 1971 च्या युध्दात या युध्दनौकेने महत्वाची भूमिका निभावली होती.