बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोनाबाधित


पाटणा – बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. याठिकाणी भाजप जद(यू) एकत्र निवडणूक लढवत असून गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा घोषित केला आहे. या जाहिरनाम्यात विशेष करुन कोरोनाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण आता बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली.


विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी बिहारमध्ये सुरू असून भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात भाजपने बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली असून एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून शरीरात हलका ताप होता, इतर सर्व पॅरामीटर नॉर्मल आहेत. पण काळजी म्हणून एम्समध्ये दाखल होत असल्याचे मोदींनी ट्विट करुन सांगितले आहे.