खडसेंनंतर आता पंकजा मुंडेंबाबत राजकीय वर्तुळात रंगू लागल्या चर्चा


मुंबई – भाजपला रामराम करत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधतील, खडसेंनी पक्ष सोडल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असताना आता राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांच्याबाबतीत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेकडून पंकजा मुंडेंना ऑफर देण्यात येत असल्याचा प्रश्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला असता, त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

पंकजा मुंडे यादेखील एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे भाजपमधील ओबीसी समाजातील नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्या होत्या. त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करणार असल्याचे जाहीर केले होते, पंकजा मुंडे यांनी गापीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे पक्षावर नाराजी व्यक्त केली होती, एकनाथ खडसेंनी त्यावेळी त्याच व्यासपीठावरून भाजपच्या पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले होते.

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांना पक्षात येण्यासाठी शिवसेना नेत्यांनी गळ घातली आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे अशी ऑफर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. भाजपने जे पेरले तेच आता उगवायला लागले आहे. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेचे दार पंकजा मुंडेंसाठी नेहमी उघडे आहे. पंकजा मुंडे यांचे स्वागत असल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. तर भाजप पक्ष ज्यांनी मोठा केला, त्या नेत्याची पंकजा मुंडे मुलगी आहे. बाळासाहेबांनी नेहमीच पंकजा मुंडे यांच्यावर प्रेम केले, शिवसेनेच्या कुटुंबातील त्या आहे. पंकजा यांच्या भगिनी बीडमध्ये खासदारकीला उभ्या राहतात, तेव्हा शिवसेनेने कधीही उमेदवार दिला नाही हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केल्यामुळे शिवसेनेत पंकजा मुंडेंनी यावे अशी ऑफर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी देऊ केलेल्या ऑफरसंदर्भात प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे त्यावेळी, पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्या प्रश्नाला उत्तर देताना कुणीही कुठेही जाणार नाही, एकही आमदार खडसेंसोबत जाणार नाही. ज्यांचे स्वत:चच खरे नाही, त्या अर्जुन खोतकरांना कोण विचारते का?, ते माझे चांगले मित्र आहेत. पण, त्यांनाच कोण विचारत नाही, मग कशाला ते ऑफर देत बसले, तुम्हाला कोण विचारते तिथे, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना ऑफरच्या वृत्ताला फडणवीस यांनी नाकारले आहे.

काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. पण अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडे यांची निवड झाल्यानंतर पंकजा पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात उतरल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाही असे मला वाटत होते, पण त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच स्पष्ट करतील, असे स्पष्टीकरण खडसेंच्या आरोपावर दिले आहे. त्यामुळे मी यावर काही टिप्पणी करणार नाही, आम्ही वेळोवेळी एकनाथ खडसेंशी बोलायचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही, एकनाथ खडसे यांच्या जाण्याने निश्चित दु:ख आहे. पण भाजपचा गड शाबूत राखण्यासाठी पक्ष कायम प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली होती.