सर्च इंजिन ते युजर कंट्रोल- गुगलचा धक्कादायक प्रवास

फोटो साभार टीवर्ज

जगातील सर्वाधिक वापराचे सर्च इंजिन म्हणून आज गुगलचे नाव घेतले जाते. वीस वर्षापूर्वी गुगल डॉट कॉम अक्षरे कॉम्प्युटर वर टाईप केली गेली की वेबपेज लोड होई आणि त्यावर सर्च बारचे बटण दाबून आपल्याला हवी ती माहिती युजर मिळवीत असे. अर्थात त्यावेळी गुगलची स्पर्धा अल्ट्राविस्टा, याहू, लाईकोस यांच्याबरोबर होती आणि गुगल या क्षेत्रात पाय रोवण्याची पराकाष्ठा करत होते. मात्र आज २० वर्षानंतर सर्च इंजिनचा मुकुट शिरावर घेऊन गुगल थांबलेले नाही तर गुगलचा वापर करणाऱ्या करोडो युजर्सवर गुगलने कंट्रोल मिळविला आहे असे दिसून येते.

तुमच्या मेल अकौंट वरून तुमच्या आवडीनिवडी, तुम्ही कधी उठता, कधी झोपता, काय काय आणि केव्हा केव्हा खाता, दिवसभर काय करता याची सर्व माहिती रोजच्यारोज गुगल कडे जमा होते. स्मार्टफोन अॅप अक्सेस करण्यासाठी जीमेल अकौंट लागते आणि या तुमच्या आयडीवरून सर्व अॅप्सचे ट्रेकिंग करण्याचे काम गुगल करत असते. आजकाल अनेक टेक कंपन्या एआयच्या मदतीने हेच काम करत आहेत.

युजर कोणते व्हिडीओ, किती वेळ पाहतात याचीही माहिती या कंपन्यांना मिळते आणि त्यामुळे तुम्ही नुसते जीमेल वर लॉगइन केले की त्वरित तुमच्या पसंतीचे व्हिडीओ यादीत दिसतात याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. तुम्ही कुठल्या दुकानात, हॉटेल मध्ये जाता, कोणते चित्रपट पाहिले, कुठे प्रवास केला, याची सर्व हिस्ट्री तुम्ही सुद्धा माय गुगल अॅक्टीव्हीटी वर जाऊन पाहू शकता.

विशेष म्हणजे भारतात स्मार्टफोन वर अँड्राईड ओएस मार्केटचा शेअर ९५.८५ टक्के आहे तर आयओएसचा मार्केट शेअर ३.२४ टक्के आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरची तुमची प्रत्येक कृती गुगलवर टिपली जात आहे.