भारत स्वतः ठरविणार देशातील सोने दर

भारतात लवकरच इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज सुरु होत असून त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारत देशातील सोन्याचे दर स्वतः ठरवू शकणार आहे. आत्तापर्यंत हे दर लंडनच्या बुलियन मार्केट मध्ये ज्या किमती आंतरराष्ट्रीय सटोडीये ठरवतील त्यानुसार ठरत होते. बुलियन मार्केट आता भारतातच सुरु होत असल्याने आंतरराष्ट्रीय सटोडीयांमुळे दर वरखाली होण्याच्या प्रकारास आळा बसणार आहे.

अहमदाबाद येथील गुजराथ इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी मध्ये बुलियन एक्स्चेंज स्थापन होत आहे. आयएफएससीआय च्या मार्गदर्शनाखाली त्याचे काम चालणार आहे. आयएफएससीआय बुलियन एक्स्चेंज नियामक म्हणूनही जबाबदारी पार पडणार आहे. केंद्रीय अर्थ विभागचे सचिव तरुण बजाज या संदर्भात म्हणाले येत्या काही महिन्यात एक्स्चेंजचे काम सुरु होत आहे. भारत जगात दोन नंबरचा सोने खरेदीदार देश आहे त्यामुळे आपले स्वतःचे एक्स्चेंज असणे आवश्यक होते. २०१९ मध्ये देशात ७०० टन सोन्याची खरेदी झाली आहे.

देशातील सर्व मोठ्या बँका, गोल्ड एक्स्चेंज फंड (ईटीएफ), एमएमसी सारख्या सरकारी एजन्सीना त्यात सदस्य केले जाणार आहे त्याचप्रमाणे मोठ्या ज्युवेलर्सना सब डीलरशिप दिली जाणार आहे. बुलियन तज्ञ पंकज पारीख यांच्या मते करोना मुळे सोन्याला मागणी नव्हती तरीही भारतात सोने दर भरमसाठ वाढत होते. अमेरिका व अन्य आंतरराष्ट्रीय सटोडिये सोने खरेदी विक्रीच्या किमती निश्चित करतात त्याच्याशी वास्तविक भारताला काही देणे घेणे नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव औंस प्रमाणे व डॉलर्स मध्ये ठरतात. त्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लागते आणि प्रती औंस २ डॉलर्स अधिक भरावे लागतात. त्या किमतीनुसार भारतात सोने दर ठरतात. भारताचे स्वतःचे बुलियन एक्स्चेंज सुरु झाले की या सर्व प्रकारास आळा बसेल.