फास्ट फूडने दम्याचा धोका

फास्ट फूड खाण्याने जाडी वाढते, हे तर आता लक्षात आलेलेच आहे. त्यामुळे १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अनेक प्रकारचे विकार वाढत असल्याचे दिसले आहे. फास्ट फूड हे प्रामुख्याने मैद्यापासून तयार केलेले असते आणि ते बराच वेळ शिजवलेले असते. एक तर मैद्यामुळे ते निसत्व असतेच, परंतु ते अधिक वेळ शिजवून त्यातली पोषण द्रव्ये घालवलेली असतात. परंतु आता त्यावर अधिक संशोधन केले गेले असून अधिक फास्ट फूड प्राशन करणे हे दम्याला निमंत्रण देणारे आहे, असे या संशोधनातून दिसून आले आहे. आठवड्यातून तीन वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा फास्ट फूड खाल्ल्यास दमा किंवा एक्झिमा यांची जोखीम वाढते. परंंतु त्याच बरोबर आठवड्यातून तीन किंवा अधिक वेळा ताजी फळे खाल्ली तर दम्याला प्रतिबंध करणारी यंत्रणा शरीरात तयार होऊ शकते.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड या विद्यापीठातील बालरोग विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक इन्नेस आशर आणि ङ्गिलीपा एलवूड यांनी फास्ट फूडचे अधिक सेवन करणार्‍या मुलांवर संशोधन केले, तेव्हा त्यांना हे निष्कर्ष मिळाले. या दोघांनी जवळपास ५१ देशांमध्ये निरीक्षण केलेले आहे. वय वर्षे ६ आणि ७ असा एक गट आणि वय वर्षे १३ आणि १४ असा एक गट असे दोन गट त्यांनी केले आणि या वयोगटांच्या पाच लाख विद्यार्थ्यांच्या फास्ट फूड खाण्याच्या सवयी आणि त्यांच्या शरीरातले बदल यांचे निरीक्षण केले. या मुलांच्या आरोग्याच्या नोंदीचे विश्‍लेषण करण्यासाठी ऑकलंडमध्ये एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने २० वर्षामध्ये करण्यात आलेल्या या निरीक्षणांचे विश्‍लेषण केले.

आता तर १०० देशांमधून पुन्हा निरीक्षणे करण्यात येत आहेत आणि त्यात २० लाख मुलांना गुंतवलेले आहे. अशा प्रकारे निरीक्षणावर आधारलेला हा जगातला सर्वात मोठा वैद्यकीय संशोधन प्रकल्प आहे. त्यामध्ये मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या जातात. मासे, मांस, फळे, भाज्या, दाळी, ब्रेड, भात, लोणी, बटाटे, दूध, अंडी यांचे सेवन ही मुले किती करत असतात याच्या वारंवार नोंदी घेतल्या जातात. त्यातून हे सगळे निष्कर्ष बाहेर आले आहेत. फास्ट फूडमुळे जगातल्या सर्वच देशात मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहेत. त्यामुळे हा अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment