गृहमंत्री अमित शहा झाले ५६ वर्षांचे 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २२ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होत असलेल्या वाढदिवसानिमित्त अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी ट्विटरवर शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणातले चाणक्य असे बिरूद अमित शहा यांना दिले जाते.

२२ ऑक्टोबर १९६४ ला अमित शहा यांचा जन्म मुंबई येथे झाला. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकात भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देण्याची कामगिरी शहा यांनी बजावली आहे. भाजपच्या या नेत्रदीपक यशामागे अमित शहा यांचे अचूक नियोजन, अपार कष्ट आणि चाणक्यनीतीचा यथायोग्य वापर कारणीभूत असल्याचे मानले जाते.

ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा मध्ये नितीन गडकरी म्हणतात, देशाचे गृहमंत्री आणि कॅबिनेट मधील माझे सहकारी अमित शहा यांना अनेक शुभेच्छा. त्यांना स्वस्थ दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी लिहितात, जनप्रिय नेता, संघटनकुशल, झुंझार आणि कुशल राजनीतिज्ञ, देशाची अंतर्गत सुरक्षा अभेद्य बनविणारे यशस्वी नेते अमित शहा यांना शुभेच्छा त्यांना दीर्घायुष लाभो ही रामचरणी प्रार्थना. पियुष गोयल लिहितात, अथक परिश्रमातून देशाची सुरक्षा भक्कम करणारे, सीएए आणि कलमं ३७० हटवून देशहिताचा निर्णय घेणारे नेते अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.