ई कॉमर्स फेस्टिव्हल सेलमध्ये ग्राहकांची दणकून खरेदी

फोटो साभार फिनप्लस

देशात अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सह अन्य ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी सुरु केलेल्या फेस्टीव्ह सिझन मध्ये पहिल्या चार दिवसातच ३.१ अब्ज डॉलर्स म्हणजे २२ हजार कोटींची विक्री झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत विक्रीचे हे प्रमाण दुप्पट असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. रेडसीट कन्सल्टंट कंपनीने बुधवारी या संदर्भात त्यांची निरीक्षणे सादर केली आहेत. त्यानुसार १५ ते १९ ऑक्टोबर या काळात गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांनी दणकून खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे देशातील महानगरांच्या तुलनेत छोटी शहरे आणि गावातील विक्रेत्यांनी जादा ऑर्डर मिळविल्याचे दिसत आहे. हा प्रतिसाद पाहता यंदा फेस्टीव्ह सेल मधील उलाढाल ७ अब्ज डॉलर्सवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. गतवर्षी हे प्रमाण ३.८ अब्ज डॉलर्स इतके होते.

फ्लिपकार्टच्या द बिग बिलियन डेजची सुरवात १६ ऑक्टोबरपासून झाली असून २१ ऑक्टोबर पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. मिन्त्रा बिग फॅशन फेस्टिव्हल १६ ते २२ ऑक्टोबर तर अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल १७ ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे आणि तो एक महिना सुरु राहणार आहे. स्नॅपडीलचा पहिला सेल १६ ते २० ऑक्टोबर या दरम्यान पार पडला आहे. विशेष म्हणजे या एकूण सेल मध्ये ८० टक्के विक्री प्रादेशिक आणि स्थानिक ब्रांडची झाली असून २० टक्के विक्री आंतरराष्ट्रीय ब्रांडची झाली आहे.