सौंदर्य प्रसाधनांमुळे अकाली प्रौढत्व

सौंदर्य प्रसाधने, केसांवर ङ्गवारले जाणारे स्प्रे आणि काही अन्नपदार्थांच्या पॅकिंगमध्ये काही घातक रसायने असतात. या रसायनांचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आजवर अनेक वेळा सांगितले गेले आहेत. विशेषत: सौंदर्य प्रसाधनांमध्ये कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणारी काही द्रव्ये असतात हे सर्वांना माहीत झालेले आहे. मात्र या सगळ्या रसायनांमध्ये आढळणार्‍या पिथेलेटस् या द्रव्यांचे काही आगळेवेगळे दुष्परिणाम आता समोर आले आहेत. हे पिथेलेटस् प्लॅस्टिकच्या काही वस्तूंमध्येही आढळते. त्यांच्यामुळे महिलांचे रजोनिवृत्ती ही अपेक्षित वयाच्या आधीच होते असे आढळून आले आहे. पिथेलेटस्चा परिणाम महिलांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर होतो. विशेषत: त्यांच्या ओव्हरीवर त्याचे काही असे परिणाम होतात की, त्यांची निर्मिती थांबते आणि परिणामी महिलांची रजोनिवृत्ती लवकर होते. काही जणींच्या बाबतीत तर ती १० ते १५ वर्षे आधी सुद्धा होऊ शकते.

साधारणत: निरोगी आणि सशक्त महिलांच्या आयुष्यामध्ये हा काळ ५१ व्या वर्षी सुरू होत असतो. परंतु पिथेलेटस्मुळे काही महिलांना त्याची चाहूल पस्तिशीनंतरच लागते. रजोनिवृत्ती ही वृद्धावस्थेकडची वाटचाल असते आणि तिचे काही परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात, कंबरदुखी सुरू होते, अशक्तपणा यायला लागतो. हृदयविकार बळावण्याची शक्यता निर्माण होते. अशा सगळ्या तक्रारी काही प्रमाणात सर्वांच्या आयुष्यात पन्नाशीनंतर सुरू होतात. परंतु पिथेलेटस्चा परिणाम असा होतो की हे सगळे त्रास पन्नाशीच्या आधीच सुरू होतात.

ब्रिटनमध्ये सुमारे ५७०० महिलांवर पिथेलेटस्चा परिणाम काय होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या रक्तात आणि लघवीमध्ये पिथेलेटस् आढळले. ज्यांच्या रक्तात ते विपुलपणे आढळले त्यांचे तारुण्य आणि जनन क्षमता लवकर ओसरत असल्याचे निरीक्षणाअंती आढळून आले. त्यामुळे आता शास्त्रज्ञांनी पिथेलेटस्चा समावेश असलेल्या सौंदर्य प्रसाधनांपासून आणि घरगुती वापराच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या आपल्या खाण्यामध्ये बाजारातल्या पॅकेज्ड् खाद्य वस्तू मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांच्या पॅकिंगसाठी जे प्लॅस्टिक वापरले जाते त्यातही पिथेलेटस् असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment