महिला धूम्रपींना वाढता धोका

कदाचित भारतामध्ये सिगारेट ओढणार्‍या महिला हे दृश्य तसे दुर्मिळच असेल. पण उच्चभ्रू समाजामध्ये महिला आता मोठ्या संख्येने धूम्रपान करायला लागल्या आहेत. हा प्रकार अमेरिकेच्या अनुकरणातून घडत आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. अमेरिकेत धूम्रपान करणार्‍या महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह नेहमीच धरला जातो, परंतु भारतात तरी ही समानता अजून दृष्टीपथात आलेली नाही. अमेरिकेतही तशी ती पूर्णपणे साकार झालेली नाही, पण धूम्रपानाच्या बाबतीत स्त्री-पुरुष समानता १०० टक्के साध्य व्हायला लागली आहे. तिथे अजूनही महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. परंतु धूम्रपानात मात्र महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे सरकत आहेत. मुले साधारणत: पौगंडावस्थेत पहिला झुरका घेतात, तसेच अमेरिकेतल्या मुली याच वयामध्ये पहिला झुरका घेतात.

१९८० च्या दशकामध्ये महिलांच्या दर दिवशी ओढल्या जाणार्‍या सिगारेटची संख्या पुरुषांच्या बरोबर होती. धूम्रपान करणार्‍या महिला त्यावेळी कमी होत्या. पण ज्या महिला धूम्रपान करत होत्या त्या दर दिवशी पुरुषांच्या बरोबरीने सिगारेट ओढत होत्या. न्यू इंग्लंड जर्नल ऑङ्ग मेडिसीन या मासिकाने अमेरिकेतील महिलांच्या धूम्रपानावर एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. अर्थात या अहवालामागे या महिलांना धूम्रपानाचे धोके कळावेत हा हेतू आहे. सगळ्यात पहिला धोका म्हणजे यकृताचा कर्करोग. अमेरिकेमध्ये धूम्रपान करणार्‍या महिलांना हा कर्करोग होण्याची शक्यता खूप मोठी आहे. गेल्या ५० वर्षात अमेरिकेच्या सरकारने अब्जावधी डॉलर्स खर्च करून लोकांचे जीवनमान वाढावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत, राहणीमान वाढावे यासाठीच्या संशोधनाला गती देण्यासाठी अनुदाने दिली आहेत. परंतु धूम्रपान करणार्‍या महिलातील यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण एवढे मोठे आहे की, त्यामुळे सरकारने गेली पन्नास वर्षे केलेले हे सारे प्रयत्न मातीमोल होणार आहेत आणि हजारो महिला धूम्रपान आणि त्यातून निपजलेला कर्करोग यामुळे मरण पावणार आहेत.

अमेरिकेतच काय परंतु सगळ्या जगातच धूम्रपानाबरोबर मद्यपान करणार्‍या महिलांची संख्याही वाढलेली आहे आणि वाढत आहे. परंतु धूम्रपान आणि मद्यपान या दोन्हींचेही महिलांवर होणारे परिणाम जास्त गंभीर असतात, कारण त्यांचे अंतर्गत अवयव पुरुषांच्या अवयवांपेक्षा नाजूक असतात आणि संवेदनशील असतात. म्हणून धूम्रपानाचा जेवढा परिणाम पुरुषांवर होतो, त्यापेक्षा अधिक परिणाम महिलांवर होत असतो. म्हणूनच जगात सर्वत्र लेडीज जीन किंवा लेडीज रम असे मद्याचे सौम्य प्रकार उदयास आले आहेत. त्याच धर्तीवर अमेरिकेतल्या काही सिगारेट तयार करणार्‍या कंपन्यांनी खास महिलांसाठी म्हणून टार आणि निकोटीनचे प्रमाण कमी असणारे सिगारेट तयार केलेले आहेत. ते ङ्गॉर लेडीज ओन्ली या सदराखाली मोडणारे सिगारेट ओढून सुद्धा महिलांना त्यांचा अधिक धोका आहे, असे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने बजावले आहे.

अमेरिकेतल्या या नियतकालिकाने १९५९ ते ६५, १९८२ ते ८८ आणि २००० ते २०१० या तीन कालावधीमधील महिलांच्या धूम्रपानात झालेल्या वाढीचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि शेवटी असा निष्कर्ष काढला आहे की, धूम्रपानाच्या वाढत्या प्रमाणामुळे यकृताच्या कर्करोगाने मरण्याची स्त्रियांमधली जोखीम चौपटीने वाढलेली आहे. त्याशिवाय इतर काही विकारांच्या बाबतीतील जोखीमही वाढलेली आहे. एवढेच नव्हे तर धूम्रपान करणार्‍या महिलांना असे काही विकार होण्याची शक्यता धूम्रपान न करणार्‍या महिलांपेक्षा २५ पटीने जास्त आहे, असेही या पाहणीत दिसून आले आहे. गेल्या २० वर्षामध्ये धूम्रपानाचे महिलांतील प्रमाण खूप वाढले आहे आणि आयुष्यात कधीही धूम्रपान न करणार्‍या महिला आता दुर्मिळ झालेल्या आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment