बाळाला लस आवश्यकच

आरोग्याच्या क्षेत्रात सातत्याने नवनवी संशोधने समोर येत असतात. त्यातून नवनव्या कल्पना समोर येत असतात. कधी कधी या कल्पना परस्पर विसंगत असतात आणि त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. एखादा संशोधक मद्यप्राशन वाईट असते असे सांगेल परंतु दुसर्‍या एखाद्या पाहणीमध्ये दररोज थोडे मद्यपान केल्याने हृदयविकारापासून सुटका होते असे निष्कर्ष हाती येतील. त्यामुळे लोकांत गोंधळ निर्माण होतो. गेल्या कित्येक दशकांपासून निरनिराळ्या रोगांच्या लसी तयार करून वापरल्या जात आहेत. लहान मुलांना तर अनेक लसी टोचल्या जात असतात आणि काही पाजल्या जात असतात. वर्षानुवर्षे या लसींचा वापर होत आहे. परंतु मध्येच काही तज्ञांनी आगळा वेगळा विचार मांडायला सुरूवात केली आहे.

लहान मुलांना मुळी लसींची गरजच नाही असे त्यांचे म्हणणे आहे. लस टोचली म्हणजे त्या बाळाची काही आजारांपासून सुटको होते आणि ते या आजारांचा प्रतिकार करू शकते मात्र लहान मुलांना स्वतःच्या ताकदीवर असा प्रतिकार करता आला पाहिजे त्याला औषधाच्या जोरावर प्रतिकार शक्ती प्रदान करण्याऐवजी त्याच्या शरीरातली नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे. त्याऐवजी आपण त्याला लसी देऊन त्याची नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता क्षीण करत असतो. अशा प्रकारचा विचार काही तज्ञांनी मांडायला सुरूवात केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. हा संभ्रम दूर होण्यासाठी अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर मुलांची पाहणी केली. तेव्हा असे लक्षात आले की, काही मुलांना अजिबात लस दिलीच नाही तर त्यांच्यात काही विकार बळावतात. सगळ्याच मुलांची नैसर्गिक रोग प्रतिकारक क्षमता मुळातच भक्कम असतेच असे नाही. त्यातल्या वीस टक्के मुलांची क्षमता कमी असते.

तेव्हा लसी देणे बंदच केले तर ८० टक्के मुले लसीशिवायही निरोगी राहतील. पण २० टक्के मुलांना मात्र हमखास आजार होतील. मात्र तरीसुध्दा लसी आवश्यक आहेत कारण आपल्या मुलांमध्ये नेमक्या कोणत्या रोगाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक क्षमता आहे याचे मोजमाप करण्याची कसलीच सोय उपलब्ध नाही. तेव्हा नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता वापरून मुलाला लसीपासून दूर ठेवण्याचा विचार केलाच आणि नेमके आपले मूल रोग प्रतिकारक्षम नसेल तर काय होईल? तेव्हा २० टक्के मुलांचे आजार टाळण्यासाठी का होईना १०० टक्के बालकांना लसी देणे आवश्यकच आहे. जेव्हा केव्हा एखादे मूल कोणत्या रोगाचा नैसर्गिकरित्या किती प्रमाणात प्रतिकार करू शकते याचे मोजमाप करण्याची काही व्यवस्था होईल तेव्हा काही मुलांना लसी न देता वाढविता येऊ शकेल. आता मात्र ते शक्य नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment