प्लॅस्टिकचे दुष्परिणाम

प्लॅस्टिकच्या बाटलीत भरलेले पाणी पिणे आरोग्याला चांगले असते, म्हणून लोक भराभर पैसे खर्च करून बाटल्यातले पाणी प्यायला लागले आहेत. परंतु एकाच बाटलीत किती वेळ पाणी भरून ठेवावे याचे तारतम्य न पाळल्यास हेच शुद्ध पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते हे अनेक प्रयोगाअंती दिसून आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करू नये, अशी सूचना दिली आहे. एवढेच नव्हे तर असा ङ्गेरवापर पुन्हा पुन्हा केल्यास कर्करोगासारखे विकार होण्याची शक्यता असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. बाटली ज्या प्लॅस्टिक पासून तयार होते ते प्लॅस्टिक पाण्यामध्ये विरघळते आणि ते पाणी शरीराला घातक ठरते. त्याच धर्तीवर आता काही संशोधकांनी खाण्याच्या प्लॅस्टिकच्या डिशवर संशोधन केले आहे. डिशचा वापर तसा होत नाही. त्यावर काही अन्न पदार्थ बाटलीत भरून ठेवल्यासारखे कायम ठेवलेले नसतात. काही वेळा प्लॅस्टिकच्या डब्यात अन्नपदार्थ गरम असतानाच भरले जाऊ शकतात आणि ते दीर्घकाळ डब्यात ठेवल्यास अन्नपदार्थातील रसायने आणि प्लॅस्टिकचे काही घटक यांची रासायनिक प्रक्रिया होऊन नवा प्रकार तयार होऊ शकतो. मात्र डब्यात सुद्धा खाद्य पदार्थ जास्त वेळ ठेवले जात नाहीत आणि ते ठेवल्यानंतर यथावकाश थंडही होतात.

गरम अन्न पदार्थांची प्रक्रिया जेवढी तीव्रपणे होईल तेवढी थंड अन्न पदार्थाची होत नाही. परंतु हाच अन्न पदार्थ अगदी शिजल्याबरोबर गरमा गरम असतानाच एखाद्या डिशमध्ये वाढला गेला तर त्याचा परिणाम डिशवर होतो. तैवान मधल्या शास्त्रज्ञांनी मेलॅमाईन प्लॅस्टिकपासून तयार होणारी क्रोकरी आणि अन्न पदार्थ यांच्या प्रक्रियेवर काही प्रयोग केले आहेत. एखादे कुटुंब किंवा मित्रमंडळी घरी स्वयंपाक तयार करून दूरवर ट्रिपला जातात. तिथे घरून नेलेले अन्नपदार्थ गरम केले जातात आणि ते पदार्थ जेव्हा मेलॅमाईन प्लॅस्टिकच्या थाळ्यांवर लोकांना वाढले जातात तेव्हा हे अन्नपदार्थ थाळीवर असेपर्यंतच तिच्यावर एवढे परिणाम होतात की, अन्नाच्या सोबत ते खाणार्‍यांच्या शरीरात मेलॅमाईन जाते. हे मेलॅमाईन किडनीचा विकार वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे किडनी स्टोन निर्माण होतो.

तैवानमधील डेली मेल या दैनिकाने या प्रयोगाची माहिती दिली आहे. हा प्रयोग करताना ते जेवण करणार्‍यांचे दोन गट करण्यात आले. प्रयोगासाठी नूडल सूपचा वापर करण्यात आला. गरमा गरम नूडल सूप एका गटाला सिरॅमिकच्या बाऊलमध्ये खायला देण्यात आले आणि दुसर्‍या गटाला तेच नूडल मेलॅमाईनच्या बाऊलमध्ये देण्यात आले. या दोन्ही गटातील लोकांच्या लघवीचे नमुने हे नूडल खाण्यापूर्वी तपासण्यात आले होते आणि नूडल खाल्ल्यानंतर या दोन्ही गटातील लोकांच्या लघवीचे नमुने नंतरच्या बारा तासांपर्यंत दर दोन तासाला एकदा तपासले. नंतर तीन आठवड्यांनी हाच प्रयोग करण्यात आला. त्यावेळी मात्र गटांची अदलाबदल करण्यात आली.

पहिल्या प्रयोगात ज्यांना सिरॅमिक बाऊल देण्यात आले होते त्यांना आता मेलॅमाईन बाऊल देण्यात आले आणि ज्यांना पूर्वी मेलॅमाईन बाऊल देण्यात आले होते त्यांना आता सिरॅमिक बाऊल देण्यात आले. याही प्रयोगात नूडल खाण्याआधी लघवीची चाचणी घेण्यात आली होती आणि नंतरही बारा तासापर्यंत दर दोन तासाने चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यात असे दिसून आले की, मेलॅमाईनच्या बाऊलमध्ये नूडल्स खाणार्‍यांच्या लघवीत मेलॅमाईनचे प्रमाण वाढलेले आहे. हे प्रमाण किती वाढते याचे विश्‍लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, हे प्रमाण सहा पटीने वाढते. सिरॅमिकच्या बाऊलमध्ये नूडल्स खाणार्‍यांच्या लघवीत सरासरी १.३ मायक्रोग्रॅम एवढे मेलॅमाईन होते. मात्र मेलॅमाईनच्या बाऊलमध्ये नूडल्स खाल्ले की, हेच प्रमाण ८.३ मायक्रो ग्रॅम एवढे झाले. म्हणजे मेलॅमाईनचा शरीरावर होणारा परिणाम इतका तीव्र आणि तुरंत होणारा आहे. त्यामुळे मेलॅमाईनचा वापर करताना या थाळ्यांमध्ये गरमा गरम अन्न वाढू नये, अशी निष्कर्षाप्रत हे संशोधक आले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment