पॅसिव्ह स्मोकिंगने निद्रानाश

धूम्रपान करणारा धूम्रपी अनेक रोगांना बळी पडतो. विशेषत: त्याला कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु पॅसिव्ह स्मोकर म्हणजे धूम्रपान करणार्‍याच्या शेजारी बसणारा परंतु धूम्रपान न करणारा निर्व्यसनी व्यक्ती सुध्दा धूम्रपानाच्या या दुष्परिणामांना बळी पडू शकतो. तो स्वत: धूम्रपान करत नसला तरी शेजारी धूम्रपान करणारा माणूस बसला असल्यामुळे त्याच्या नाका, तोंडातून सिगारेटचा धूर त्याच्या शरीरात जातच असतो. त्याला पॅसिव्ह स्मोकर म्हटले जाते. मात्र अलीकडच्या काळामध्ये या पॅसिव्ह स्मोकिंगच्या बाबतीत नवे संशोधन पुढे आले असून पॅसिव्ह स्मोकरला निद्रानाश होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. या संबंधात चीनमध्ये करण्यात आलेल्या पाहणीमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे. चीनमध्ये धूम्रपान करणार्‍यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. या देशातले ५५ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचा वापर करतच असतात. पण त्यातल्या त्यात सिगारेट तिथे जास्त लोकप्रिय आहे.

चीनशिवाय अमेरिका आणि ब्रिटन याही देशामध्ये ही पाहणी करण्यात आली. पॅसिव्ह स्मोकिंग आणि निद्रानाश याचे काहीतरी जवळचे नाते आहे असा या पाहणीचा निष्कर्ष आहे. पॅसिव्ह स्मोकर या वर्गामध्ये धूम्रपान करणार्‍यांची मुले, पत्नी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या शेजारी बसणारी व्यक्ती यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अशा लोकांच्या बाबतीत चीनमध्ये ६ हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यातल्या बर्‍याच लोकांच्या झोपेच्या संबंधीच्या तक्रारी समोर आल्या.

विशेषत: निद्रानाश हा बर्‍याच रुग्णांमध्ये असल्याचे आढळले. पॅसिव्ह स्मोकिंगला काही देशामध्ये सेकंड हॅन्ड स्मोकिंग असे म्हणतात किंवा त्याला दुसरे एक नाव आहे एन्व्हायरन्मेंटल टोबॅको स्मोक (इटीएस). याचा अर्थ स्वत: सिगारेट न ओढता हवेमध्ये सोडला गेलेला धूर आत ओढणे. एखाद्या कार्यालयात एकूण दहा लोक काम करत असतात. परंतु त्यातले सात-आठ जण सिगारेट ओढणारे असतात. त्यांच्यामुळे त्या कार्यालयातली हवा धुराने भरून गेलेली असते. अशा कार्यालयात काम करणार्‍यांना इटीएस म्हटले जाते. त्यांना कोणत्याही क्षणी हृदयविकार किंवा श्‍वसनाचा विकार जडण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment