ऑक्सफर्ड करोना लस चाचणी स्वयंसेवकाचा मृत्यु

करोना विषाणूवर ऑक्सफर्ड बनवीत असलेल्या अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचणीसाठी नाव दिलेल्या उमेदवाराचा ब्राझील मध्ये मृत्यू झाल्याची खबर आहे. ब्राझील मध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरु आहेत. ब्राझील हेल्थ अॅथॉरीटीने या संदर्भात बुधवारी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या चाचणीसाठी आलेल्या एका तरुण उमेदवाराचा मृत्यू झाला आहे पण त्याला ही लस दिली गेलेली नव्हती त्यामुळे लसीच्या चाचण्या सुरु राहणार आहेत. करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जगभर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र सर्वाधिक आशा ऑक्सफर्डच्या लसीवर आहेत असेही सांगितले जात आहे.

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलोच्या मदतीने ब्राझील मध्ये ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या घेतल्या जात असून त्याचा तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. त्या दरम्यान हा २८ वर्षीय उमेदवार मरण पावला असून तो ब्राझीलचाच रहिवासी आहे. दरम्यान ऑक्सफर्ड वैज्ञानिकांनी लसीच्या सुरक्षेबाबत काहीही चिंता नसल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी सप्टेंबर मध्ये ब्रिटन येथेही या लसीच्या चाचणीदरम्यान एका उमेदवाराला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले होते. त्याला लस दिली गेली होती. त्यानंतर जगभर या लसीच्या चाचण्या थांबविल्या गेल्या होत्या. पण नंतर अमेरिका सोडून अन्य देशात या चाचण्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्राझील मधील घटनेनंतर अमेरिका या लसीच्या चाचण्या घेण्यासाठी परवानगी देणार का यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.