बिस्किटाची चव चाखण्यासाठी ही कंपनी देणार ४० लाख रुपये पगार


संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे प्रत्येथ देशातील जनजीवन विस्कळीत झाले असून बरेच उद्योगधंदे या काळात बंद होते. याचदरम्यान बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात केलेली असतानाच एका बिस्किट कंपनीने अशी नोकरी ऑफर केली, ज्यामुळे त्या नोकरीसाठी अनेकांनी अर्ज करण्यास सुरूवात केली. हे अर्ज स्कॉटिश बिस्किट उत्पादक ‘बॉर्डर बिस्किट’ने मागविले आहेत. कंपनीने यात घातलेली अट बहुधा कोणालाही आकर्षित करू शकेल. ‘मास्टर बिस्किटर’ आम्ही शोधत असल्याचे कंपनीने म्हटले आहे

यासंदर्भातील वृत्त ‘द इंडिपेन्डंट’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मास्टर बिस्कीटर पदासाठी कंपनीला अशा कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे, जे बिस्किटांची चव स्वाद घेऊ शकतील. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याला बिस्किट बनविण्याचे आकलन आणि त्याची चव असली पाहिजे. या व्यतिरिक्त, त्याच्याकडे नेतृत्व आणि संवाद कौशल्य देखील असले पाहिजे.

याबाबत बॉर्डर बिस्किट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पॉल बार्किन्स यांनी निवेदनात म्हटले आहे की, ही बिस्किट उद्योगात रस असणाऱ्यांना उत्तम संधी आहे. या मास्टर बिस्किटरच्या ज्ञानाचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि अशी बिस्किटे बनवायची आहेत, जी प्रत्येकाची पसंती बनेल. याव्यतिरिक्त, बॉर्डर बिस्किटांचे ब्रँड हेड सुजी कार्लाव्ह म्हणतात की, ग्राहकांना सर्वोत्तम स्वाद आणि गुणवत्तेचे बिस्किटे देण्यास ही कंपनी कटिबद्ध आहे. या कामासाठी आम्ही मास्टर बिस्किटर शोधत आहोत.

पगाराबद्दल चर्चा केल्यास, अर्ज करणाऱ्या मास्टर बिस्कीटर पदासाठी वार्षिक ४० हजार पौंड म्हणजे सुमारे ४० लाख रुपयांचे पॅकेज मिळेल. आणखी एक विशेष म्हणजे यात वर्षाला ३५ दिवस सुट्टी देखील उपलब्ध असेल. ही पूर्णवेळ नोकरी असेल. आपल्या इन्स्टाग्राम पेजवर बॉर्डर बिस्किट कंपनी खूप लोकप्रिय आहे. या पेजद्वारे, कंपनी आपल्या उत्पादनांची माहिती लोकांमध्ये शेअर करत असते. इन्स्टाग्राम युजर्सदेखील या पेजवरील माहिती उत्सुकतेने बघतात आणि प्रतिक्रिया देतात.

अहवालानुसार, कंपनी म्हणते की विविध देशभरातील लोकांना आम्ही अर्ज करण्यास प्रोत्साहित करीत आहोत आणि प्रतिभावान लोकांची मुलाखत घेण्यासाठी उत्सुक आहोत. या नोकरीची जाहिरात आल्यानंतर युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. हे सर्वोत्तम काम असेल. एकीकडे जिथे तुम्हाला बरेच पैसे मिळतील तर दुसरीकडे, बिस्किटे देखील विनामूल्य खाण्यासाठी उपलब्ध असतील.