शिक्कामोर्तब! एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जयंत पाटलांकडून घोषणा


मुंबई – उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर अखेर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पक्षावर मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून वेग घेतला होता. अखेर या वृत्तांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

भाजपची खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचे मला सांगितले. त्यामुळे त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश होत आहे हीच आनंदाची बाब आहे. भाजपमध्ये त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे भाजप त्यांनी सोडली असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.