पीएमपीएमएलची ”फक्त ५ रूपयांत ५ किलोमीटर” प्रवास नवी योजना


पुणे: पुण्याची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या पीएमपीएमएलने प्रवास करणारा मोठा वर्ग शहरात असून पीएमपीएमएलने या सर्व वर्गासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर खास भेट आणली आहे. नागरिकांना या भेटीत स्वस्त आणि मस्त प्रवासाची संधी मिळणार आहे. ”फक्त ५ रूपयांत ५ किलोमीटर” प्रवास ही नागरिकांसाठी नवी योजना पुणे महानगर प्रादेशिक परिवहनने बुधवारी जाहीर केली. या सेवेला दसऱ्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप उपस्थित होते.

दरम्यान जगताप यांनी प्रत्येक ५ मिनीटांनी या सेवेत गाड्या ऊपलब्ध होतील असे स्पष्ट केले. अटल प्रवासी योजना म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत प्रवासी नेणारी पूरक प्रवासी योजना आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये एक मध्यभाग निश्चित करून त्याच्या ५ किलोमीटर परिघात वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या जातील. तिथून प्रवासी त्यांना हव्या असलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीने जातील.

पुण्यात हा मध्यभाग महापालिका मुख्य इमारत व पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड असेल. पुणे महापालिकेपासून ५ किलोमीटर परिघात ९ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. येथून फक्त ५ रूपयात कोणत्याही मार्गावर जाता येईल. या सर्व गाड्या मिडी म्हणजे लहान गाड्या आहेत. यासाठी १८० गाड्या वापरण्यात येणार आहे. दर ५ मिनिटांनी नवी गाडी असणार आहे. त्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या काही मार्गांवरील गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. पण त्यात प्रवाशांची अडचण होणार नाही व पीएमपीएलचे उत्पन्न बुडणार नाही याची देखील काळजी घेण्यात आल्याचे जगताप म्हणाले.

याशिवाय शहरात नवे ३७ मार्गही सुरू करण्यात येणार आहेत. हे नवे मार्ग प्रवाशांचे अभिप्राय, अपेक्षित उत्पन्न, पीएमपीएलचे अधिकाऱ्यांचे मत या सगळ्याचा अभ्यास करूनच ठरवण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली. हे नवे मार्ग व अटल प्रवासी योजना दसऱ्यापासून सुरू होईल.