जयंत पाटलांचा गौप्यस्फोट; खडसेंनंतर आणखी डझनभर भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर


मुंबई – उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर अखेर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पक्षावर मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पण त्यांच्यासोबतच भाजपचे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पाटील म्हणाले, बऱ्याच जणांनी खासगीत खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. खडसेंचे नेतृत्व जे मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही, असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील. तसेच कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणे परवडणार नसल्यामुळे डझनभर आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.