एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडले मौन


नांदेड – सध्या राजकीय वर्तुळात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत, एकनाथ खडसे पक्षात सातत्याने डावलले जात असल्यामुळे भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत, खडसेंनी त्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचेही सांगण्यात येत आहे, पण भाजपचे सर्वच नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत, असा दावा करत आहेत.

एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर चार वर्ष ते मंत्रिमंडळाच्या बाहेर होते, एकनाथ खडसेंना विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी नाकारण्यात आली, त्यानंतर विधानपरिषद जागेसाठीही खडसेंना संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून एकनाथ खडसे भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली.

भाजपमधून बाहेर पडत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे एकनाथ खडसे हे खंदे समर्थक मानले जातात, परंतु एकनाथ खडसेंना मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने भाजपमध्ये वारंवार डावलण्यात आले, मागील वेळी एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरुन पक्षांतर्गत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा पंकजा मुंडेही पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या.

मात्र पंकजा मुंडे यांना भाजपाने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात दिसू लागल्या. पंकजा मुंडे सध्या अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करत आहेत, पंकजा मुंडे यांना यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला, पंकजा त्यावर म्हणाल्या की, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचे? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.