एकनाथ खडसेंनी डिलीट केले मोदींवरील टीकेचे समर्थन करणारे ट्विट


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे ट्विट रिट्विट करुन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे सूचक संकेत दिले खरे. पण खडसे यांनी अवघ्या काही वेळातच ते ट्विट डिलीट केले. अवघ्या काही वेळातच एकनाथ खडसे यांनी हे ट्विट डिलीट का केले? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. ‘तुम्ही म्हणाल ते धोरण, बांधाल ते तोरण’ असे म्हणत बॅनरही झळकवले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे चिन्ह ‘कमळ’ खडसे यांच्या समर्थकांच्या बॅनरवरुन गायब असल्याचे वृत्त आहे.

आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!.

देशाला उद्देशून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. अनेकांचा या भाषणातून अपेक्षाभंग झाल्याची टीका झाली. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट केले. नेमके हेच ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. ऐरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कोणत्याच गोष्टीचे समर्थन कोणताच भाजप नेता करताना दिसत नाही. पण एकनाथ खडसे यांनी हे धारिष्ट्य दाखवल्यामुळे एकनाथ खडसे हे आता मनाने खूप पुढे गेले असून भाजपमधून बाहेर पडायचे हे जवळपास त्यांनी निश्चित केल्याचे मानले जात होते.