कमी पगाराला वैतागले ब्रिटनचे पंतप्रधान; लवकरच देणार राजीनामा?


लंडन: एखाद्या देशाचे पंतप्रधान हे देशाचे पालक आणि मार्गदर्शक असतात असे म्हटले जाते. त्याचबरोबर देशासाठी कल्याणकारी योजना राबवणे, देशातील नागरिकांचे हित जपणे यापासून अनेक जवाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असतात. पण जर एखादा पंतप्रधानच पगार कमी पडत असल्याची बोंब मारत असेल तर… आश्चर्यच म्हणावे लागेल. असे आम्ही नाही पण खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान म्हणत आहेत. कारण सध्या याच अडचणीचा सामना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन करत आहेत. पंतप्रधान म्हणून मिळणारे वेतन कमी असल्याने पुढील सहा महिन्यात पद सोडण्याचा त्यांचा विचार असल्याचे वृत्त एका ब्रिटिश वृत्तपत्राने दिले आहे.

१,५०,०४२ पाऊंड्स (जवळपास १.४३ कोटी रुपये) एवढा पगार बोरिस जॉन्सन यांना वर्षाकाठी मिळतो. या वेतनात घरखर्च भागत नसल्याचे जॉन्सन यांना वाटते. जॉन्सन यांचा पंतप्रधान पदावरून दूर झाल्यास वृत्तपत्रात स्तंभलेखन करून यापेक्षा दुप्पट रक्कम मिळवू, असा विचार आहे. जॉन्सन सध्याच्या घडीला कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि ब्रेक्झिटचा सामना करत आहेत.

पंतप्रधान होण्याआधी जॉन्सन स्तंभलेखन करायचे. त्यांचा उदरनिर्वाह त्यातूनच चालायचा. त्यांना स्तंभलेखनातून मिळणारे उत्पन्नदेखील जास्त होते. आता पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पण उत्पन्न अतिशय कमी आहे. बोरिस जॉन्सन यांना सहा अपत्य आहेत. यातील काही जण लहान असल्यामुळे त्यांची आर्थिक जबाबदारी जॉन्सन यांच्यावर आहे. जॉन्सन यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली. त्यांचा एक मुलगा शाळेत शिकतो. त्याचे शुल्कदेखील जॉन्सन यांना भरावे लागत असल्याचे जॉन्सन यांच्या पक्षाच्या एका खासदाराने सांगितले.

ब्रिटनमधील राजकीय वर्तुळात बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास पुढील पंतप्रधान कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपदासाठी अर्थमंत्री ऋषी सुनक, परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब, माजी आरोग्य जेरेमी हंट, कॅबिनेट मंत्री मिशेल गोव यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. सुनक यांनी कोरोना संकट काळात आपल्या वेतनातून मदत केली होती.