खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी भाजपने दिल्या शुभेच्छा


मुंबई – भाजप नेते एकनाथ खडसेंनी आपल्या भाजप सदस्यात्वचा राजीनामा दिला असून त्याच्या सोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, एकनाथ खडसे शेवटपर्यंत भाजपमध्येच राहावे यासाठी प्रयत्न देखील केले गेल, पण त्यांचा निर्णय ठरलेला असल्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर केशव उपाध्ये म्हणाले की, पक्षातून कोणताही नेता अथवा कार्यकर्ता बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, एकनाथ खडसेंच्या संपर्कात प्रदेशाध्यक्ष सातत्याने होते, कोणताही त्रास संघटनेला होणार नाही, असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु पक्ष सोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतल्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. शेवटपर्यंत आम्हाला आशा होती, पक्षात एकनाथ खडसे राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. एकनाथ खडसेंसाठी संघटनेने जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.

भाजपचा त्याग एकनाथ खडसेंनी केलेला असल्याने ते शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, त्याचबरोबर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.