‘ट्रम्प २०२०’ मास्क, पोलीस अधिकाऱ्याच्या नोकरीवर गदा?

फोटो साभार मेट्रो

मियामी मधील एका पोलीस अधिकाऱ्याला ‘ ट्रम्प २०२०’ अशी अक्षरे असलेला मास्क लावल्याची चांगलीच किंमत मोजावी लागण्याची पाळी आली असून कदाचित या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड केले जाण्याची शिक्षा मिळू शकेल असे सांगितले जात आहे. अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता ऐन भरात आली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार नियमावली अगोदरच जारी झाली आहे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जात आहे.

अमेरिकेतील राजकीय पक्ष कुणी प्रचार नियमावलीचे उल्लंघन करत नाही ना यावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. मियामी मध्ये एका मतदान केंद्रावर मतदानासाठी युनिफॉर्म मध्ये आलेल्या पोलिसाचा फोटो डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष स्टीव्ह शिमोनीडीस यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात या पोलीस अधिकाऱ्याने तोंडाला मास्क लावला आहे पण त्या मास्क वर ‘ट्रम्प २०२०’ अशी अक्षरे असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले आहे.

यामुळे प्रचार नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला असून या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.