आता भारतीय स्वयंपाकाला स्वाद देणार स्वदेशी हिंग

फोटो साभार जागरण

औषधी गुणांनी भरपूर आणि जेवणाला विशेष स्वाद देणारा हिंग भारतातच उत्पादित केला जाणार असून हिंगाच्या शेतीची सुरवात हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्यात नुकतीच करण्यात आली. विशेष म्हणजे जगात जेवढे हिंगाचे उत्पादन होते त्यातील ५० टक्के हिंग भारतातच खपतो पण आजपर्यंत देशात हिंगाची शेती करण्याचे प्रयोग फारसे झाले नव्हते. भारताला आवश्यक असलेला हिंग अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, इराण मधून आयात केला जातो. त्यातील ९० टक्के हिंग अफगानिस्थानातून येतो.

मिळालेल्या माहितीनुसार हिमाचलच्या पालनपूर येथील हिमालय जैवसंपदा प्रौद्योगिकी संस्थानाला हिंगाची रोपे तयार करण्यात यश आले असून ही रोपे लावण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लाहोल स्पिती या समुद्र सपाटीपासून १५ हजार फुट उंचीवर असलेल्या जिल्ह्याची निवड केली गेली आहे. १७ ऑक्टोबर रोजी देशातील पाहिले हिंग रोप येथे लवले गेले असून ही लागवड यशस्वी ठरली तर शेतकऱ्याची आर्थिक भरभराट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या सात शेतकऱ्यांना चाचणी साठी हिंग रोपे दिली गेली आहेत.

भारतात वर्षाला १२०० टन हिंग खपतो आणि तो सर्व आयात करावा लागतो. वरील प्रयोगशाळेत हिंगाच्या सहा व्हरायटी तयार केल्या गेल्या असून उत्तराखंड पहाडी भाग, लडाख, किन्नोर अश्या पहाडी भागात हिंग शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. हिंगासाठी २० ते ३० डिग्री तापमान लागते आणि पिक तयार होण्यास पाच वर्षे लागतात. मुळे पूर्ण विकसित झाली की मग हिंगाच्या बिया तयार होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात हिंगाची किंमत ३५ हजार रुपये प्रती किलो अशी आहे.