स्मरणशक्तीच्या गोळ्या विसरा

शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा जवळ आल्या की, औषधांच्या दुकानात स्मरण शक्तीच्या गोळ्याना प्रचंड मागणी येते. विशेषत: गणिताच्या परीक्षेच्या दिवशी किंवा रसायन शास्त्राच्या पेपर दिवशी ही गोळी घेऊन परीक्षेला जाण्याची पद्धतच पडत चालली आहे. त्यामुळे पालक मंडळी या गोळ्या इतक्या संख्येने खरेदी करतात की, औषधांच्या दुकानातल्या या गोळ्यांचा साठा संपत येतो. काही पालकांचे असे मत आहे की, या गोळ्या घेतल्याने मुलांची स्मरणशक्ती सुधारते आणि निव्वळ स्मरणशक्तीवर अवलंबून असणार्‍या विषयांचे पेपर मुलांना तुलनेने सोपे जातात. अशा प्रकारचे अनुभव पालकांना येत असल्यामुळे सर्व पालकांमध्ये या गोळ्यांच्या संबंधात एक संदेश जातो आणि सगळेच पालक गोळ्या खरेदी करायला गर्दी करतात. पण या गोळ्या नेमक्या उपयोगी पडतात का? आणि त्या खरोखर घ्याव्यात का? असा प्रश्‍न आता विचारला जायला लागला आहे आणि मानसशास्त्रज्ञांनी तरी या गोळ्या अजिबात घेऊ नये, असा सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. या मागची दोन कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे कोणतीही वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट जशास तशी लक्षात ठेवण्याची क्षमता ही मुळात कोणत्याच औषधाने वाढत नसते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी या गोळीचा कसलाच उपयोग नाही. या गोळीच्या ङ्गायद्याचा एक सूक्ष्म भाग लक्षात ठेवला पाहिजे की, औषधाने स्मरणशक्ती वाढत नसली तरी त्याच्यामुळे एकाग्रता मात्र वाढत असते आणि या गोळ्यांनी मुलांची एकाग्रता वाढली की, ते एकाग्रतेने अभ्यास करतात आणि त्याचा त्यांना ङ्गायदा होतो. हा ङ्गायदा सुद्धा काही मुलांच्या बाबतीतच होतो. सर्वांच्या बाबतीत होत नाही.

सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, एकाग्रता आणि स्मरणशक्ती या दोन्ही गोष्टी मनाशी आणि मेंदूशी निगडित आहेत आणि मन ही एक ङ्गार गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया आहे. विचाराचा मनावर ङ्गार परिणाम होत असतो. विचार बदलला की मन सशक्त होते आणि मन एकदा सशक्त झाले की, ते शरीराला कामाला लावते. मनाची ही समजूत कल्पनेवर आधारलेली असते. एखाद्या मुलाचे आई-वडील मुलाचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून मेमरी पिल्स् म्हणजे स्मरणशक्तीच्या गोळ्या विकत आणतात. त्यांचा ङ्गार चांगला उपयोग होतो असे त्यांना कोणी तरी सांगितलेली असते आणि ते सांगणे प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले असल्यामुळे त्यावर त्यांचा विश्‍वास बसतो.

या गोळ्यांनी अभ्यास चांगला होतो अशी श्रद्धा त्यांच्या मनात जागी होते. ती तज्ज्ञांच्या मते चुकीच्या विचाराच्या आधारे जागी होत असली तरी त्या पालकांच्या दृष्टीने ती खरी असते. त्यामुळे ते गोळ्या घेऊन येऊन मुलांना खाऊ घालतात आणि त्या मुलाच्या मनात सुद्धा त्यांच्या आईवडिलांसारखाच आता आपला अभ्यास चांगला होणार, असा आत्मविश्‍वास जागा होतो आणि त्या आत्मविश्‍वासामुळे त्याचा अभ्यास सुधारतो. म्हणजे या ठिकाणी कसली तरी वनौषधी घातलेली मेमरी पिल देण्याऐवजी एक कसलीही गोळी दिली तरी अभ्यास सुधरू शकतो. कारण तो अभ्यास आत्मविश्‍वासामुळे सुधारलेला असतो. प्रत्यक्षात ती जी गोळी आहे त्या गोळीमध्ये स्मरणशक्ती वाढविणारे कोणतेही घटक नाहीत आणि त्या गोळ्या तयार करणार्‍यांनी सुद्धा या गोळीमुळे स्मरण शक्ती सुधारण्याची प्रक्रिया कशी घडते हे दाखवून दिलेले नाही.

मात्र काही लोक असे म्हणतील की, त्या गोळीत काही असो की नसो, पण ती घेतल्यामुळे अभ्यास सुधारणार आहे अशी मनाची समजूत होऊन का होईना पण अभ्यास सुधारतोय ना? मग या गोळीला आक्षेप कशाला घ्यायचा? आक्षेप घेण्याचे कारण असे आहे की, या गोळीचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. त्यातले काही घटक लहान मुलांत निद्रानाशासारखे विकार बळावण्यास कारणीभूत ठरत असतात. तेव्हा अशा गोळ्या न घेता मुलाला छान शांत झोपू द्या, त्याचा आहार हलका राहील यावर लक्ष द्या आणि त्याच्या मनात निराशाजनक विचार येणार नाहीत याकडे लक्ष द्या. एवढे केल्याने सुद्धा मुलाची स्मरणशक्ती सुधारू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment