वजन घटवण्याबाबत काही तथ्ये

आरोग्याच्या क्षेत्रात सर्वाधिक चर्चा कशाची होत असेल याचा अंदाज घेतला तर असे लक्षात येते की, वजन उतरवणे हा विषय सर्वाधिक चर्चिला जातो. वृत्तपत्रातूनही याच विषयावर ङ्गार चर्चा होते. खूप लिहिले जाते आणि बरेच वाचलेही जाते. वाचून नेमके काय होते माहीत नाही, कारण एवढे लिहून आणि वाचून सुद्धा वजन वाढण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. लठ्ठ लोकांचे प्रमाण तर वाढतच चाललेले आहे. आहे त्या लठ्ठ लोकांचे वजन सुद्धा वाढत चालले आहे आणि ते जसे वाढत चालले आहे तस तसे लिखाणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. भरपूर लिहायचे म्हटले की, काही अतिशयोक्त आणि अशास्त्रीय कल्पनाही रेटून पुढे केल्या जातात. त्यामुळे वजन घटवण्याच्या संबंधात बर्‍याच चुकीच्या कल्पना लोकमानसात रूढ होतात.

या कल्पना दूर करण्यासाठी बर्मिंगहॅमच्या युनिव्हर्सिटी ऑङ्ग अलाबामा या विद्यापीठा तील न्यूट्रिशन ओबेसिटी रिसर्च सेंटर या केंद्रातील संशोधक डेव्हीड बी ऍलिसन यांनी काही लिखाण केले आहे आणि या चुकीच्या कल्पनातील थोतांड कमी करून त्या ठिकाणी शास्त्रीय कल्पना मांडल्या आहेत. खाण्यात थोडा जरी बदल झाला तरी वजन वाढते, पण ते वजन कमी करण्यास मात्र खूपच वेळ लागतो असे मानले जाते. ही कल्पना चुकीचे आहे, असे ऍलिसन यांनी म्हटले आहे. चालण्याच्या व्यायामाने वजन घटते हा तर सार्वत्रिक समज आहे आणि दररोज एक मैल चालण्याने पाच वर्षात ५० पौंड वजन कमी होते अशी हमी बरेच लोक देत असतात. पण ऍलिसन यांना हे मान्य नाही.

आपणही दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या लोकांचे निरीक्षण करावे. आपल्यालाही असाच प्रत्यय येईल. कित्येक मॉर्निंग वॉकर पाचच काय पण किती तरी वर्षे दररोज नियमाने एक मैलापेक्षा जास्त चालत असतात. परंतु त्यांच्या वजनात एका पौंडाचाही ङ्गरक पडलेला नसतो. त्यामुळे ऍलिसन यांनी चालण्याच्या व्यायामातून वजन कमी होते या म्हणण्यात काही तथ्य नाही, असे म्हटले आहे. अती महत्वाकांक्षी व्यक्ती जीवनात्मक नकारात्मक घटनांमुळे निराश होतात आणि त्यामुळे त्यांचे वजन वाढते, असेही आजवर मानले गेलेले आहे. पण ऍलिसन यांनी हेही म्हणणे खोडून काढलेले आहे.

वजन कमी करायचे झाल्यास ते कमीत कमी काळात एकदम मोठ्या प्रमाणावर घटवू नये, असा सल्ला डॉक्टर मंडळी देत असतात. पण तोही सल्ला चुकीचा असल्याचे ऍलिसन यांनी म्हटले आहे. ऍलिसन यांनी लठ्ठपणाच्या संदर्भात वस्तुस्थिती सांगताना, काही गोष्टी संदिग्ध असल्याचे म्हटले आहे. म्हणजे त्या चुकीच्या आहेत असेही सिद्ध झालेले नाही आणि बरोबर आहेत असेही दिसून आलेले नाही. उदा. लहानपणातील खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाचा पाया घातला जातो आणि मोठेपणी लठ्ठपणा वाढतो. हे म्हणणे पूर्णपणे चूकही आहे असे नाही आणि बरोबर आहे असेही सिद्ध झालेले नाही. अशा संदिग्ध संशोधनामध्ये ङ्गळांचा समावेश आहे. भरपूर ङ्गळे खाल्ल्याने आणि भाज्या खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते हेही म्हणणे शंभर टक्के बरोबर नाही. अधूनमधून चारीमुरी खाणारे लोक लठ्ठ होतात आणि त्यांचे वजन वाढते. याही म्हणण्याला शंभर टक्के दुजोरा मिळालेला नाही.

डेव्हीड बी ऍलिसन यांनी या संदर्भात काही निश्‍चित स्वरूपाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. लठ्ठपणा हा आनुवंशिक असतो हे बरोबर आहे. परंतु आनुवंशिक असला तरीही तो टाळता येतो. व्यायामाने वजनाची वाढ रोखता येते हेही सत्य आहे. काही औषधांमुळे वजन कमी होऊ शकते. तसेच त्यांच्यामुळे आहे ते वजन तसेच राहूही शकते. त्याची वाढ खुंटवता येते. वजनाची वाढ रोखण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे जरूर आहे. जो जास्त खातो तोच लठ्ठ होतो. तेव्हा जेवणावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते, मात्र ही गोष्ट सर्वांनाच लागू होईल असे नाही. शस्त्रक्रियेने वजन कमी होण्याच्या बाबतीत दूरगामी परिणाम होतो. आयुष्यमान वाढते आणि मधुमेहाची शक्यता कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment