रिलायन्स जिओची अमेरिकेत ५ जी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी

फोटो साभार केरळ कौमुदी

अमेरिकन टेक्नोलॉजी फर्म क्वालकॉम सह रिलायंस जिओने अमेरिकेत त्यांची ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अमेरिकेतील सॅन दियागो येथे पार पडलेल्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये रिलायंस जिओचे अध्यक्ष मॅथ्यु ओमान यांनी ही घोषणा केली.

ओमान म्हणाले, क्वालकॉम आणि रिलायंस जिओची उपकंपनी रेडिसीस एकत्र ५ जी तंत्रज्ञानावर काम करत आहेत. भारतात ५ जी तंत्रज्ञान लवकरच लॉंच केले जाणार आहे. येत्या काही दिवसात भारतीय युजर्स १ जीबीपीएस पर्यंत स्पीडचा आनंद घेऊ शकणार आहेत. हे तंत्रज्ञान पूर्ण स्वदेशी असल्याचेही त्यांनी सांगितले. जिओने स्वदेशी ५ जी आरएएन (रेडिओ अॅक्सिस नेटवर्क) विकसित केले असून हे नेटवर्क अल्ट्रा हायस्पीड आउटपुट देण्यासाठी अतिशय योग्य आहे.

या उत्पादनाचे अमेरिकेत यशस्वी परीक्षण केले गेले आहे. याचाच अर्थ जिओ ५ जी सेवा अमेरिकन तंत्रज्ञान आणि भारतीय उपकरणे या पद्धतीने देणार आहे. या चाचणीमुळे १ जीबीपीएस स्पीड युजर्सना देणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका, द.कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशातील ५ जी कस्टमर्स १ जीबीपीएस स्पीडचा वापर करू शकतात. रिलायंस समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या १५ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ५ जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच जिओ ५ जी टेस्टिंग साठी तयार असल्याची घोषणा केली होती. भारतात अजून ५ जी स्पेक्ट्रम उपलब्ध केला गेलेला नाही.