महागड्या पेयांपेक्षा शुद्ध पाणी प्या

नवी दिल्ली – थोडा घसा कोरडा पडला आणि काही तरी पिण्याची गरज भासली की, आपण एखाद्या दुकानात किंवा हॉटेलात शिरून १५-२० रुपये देऊन एखादे थंड पेय पितो आणि आपली तहान भागवतो. त्यामुळे तात्पुरती तहान भागते, परंतु त्या पेयाच्या रूपाने आपण काही ग्रॅम साखर आणि काही प्रमाणात रसायने आपल्या पोटात घातलेली असतात. या पेयांचा आरोग्याला तर काही फायदा होत नाहीच, परंतु अपाय मात्र होतो. तेव्हा अशा पेयांच्या नादी लागण्यापेक्षा स्वच्छ, शुद्ध पाणी पिणे बरे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

पाणी हे जगातले सर्वात उत्तम पेय आहे. ते सौंदर्यवर्धक आहे आणि ते आपण सहजपणे घरात उपलब्ध करू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुद्ध पाण्याच्या नियमित प्राशनाने त्वचा चांगली होते. तेव्हा तहान लागेल तसे अधूनमधून पण भरपूर पाणी पिले पाहिजे. घामाच्या रुपाने आपल्या शरीरातून काही द्रव्ये आणि पाणी निघून जात असते आणि त्यामुळे थकवा येतो. तो घालविण्यासाठी शुद्ध पाणीच उपयोगी पडते.

आपल्या शरीरात मूत्रपिंडे ही फिल्टरचे काम करत असतात. हे फिल्टर सतत कार्यरत ठेवले तर ते सक्षम राहते आणि त्याला सतत कार्यरत ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे. आपण जितके जास्त पाणी पिऊ तितकी आपल्या शरीरातली विषारी द्रव्ये फिल्टर करून किडनीमार्फत मूत्राशयाकडे पाठवली जातात आणि तिथून ती लघवीच्या रुपाने बाहेर फेकली जात असतात. ही क्रिया वारंवार होण्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे.

पाणी भरपूर पिल्याने शरीरातील उष्मांकाचे संतुलन होते, कारण पाणी जास्त पिले की, अन्नाची गरज कमी भासते. म्हणजेच भरपूर पिल्याने वजन नियंत्रित होते. आपले सांधे आखडू नयेत यासाठीही भरपूर पाणी पिले पाहिजे. डोकेदुखीचा त्रास असणार्‍यांनी दर तासाला अर्धा ग्लास पाणी प्यावे, डोकेदुखी नियंत्रित होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment