नासाच्या यानाने अंतराळात घेतली उल्कापिंडाची भेट

नासाच्या ओसिरीस- रेक्स (OSIRIS-REX) या स्पेस क्राफ्टने अंतराळात एक ऐतिहासिक भेट पार पाडली. प्रचंड मोठ्या इमारतीच्या आकाराचे खडक असलेल्या बेनू (BENNU) या उल्कापिंडाच्या पृष्ठभागावरून या यानाने धुळीचे नमुने गोळा केले आहेत. या धुळीच्या परीक्षणातून ब्रह्मांडाचे रहस्य तसेच पृथ्वीवरील जीवनाची सुरवात कशी झाली याची माहिती मिळण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत.

उल्कापिंडातून नमुने गोळा करणारा अमेरिका, ओसिरीस रेक्सने पार पडलेल्या कामगिरीमुळे जगातील दुसरा देश बनला आहे. जपान पहिल्या नंबरवर आहे. पुढच्या आठवड्यात या ऐतिहासिक भेटीतून ओसिरीसने किती नमुने गोळा केले याचा खुलासा होऊ शकणार आहे. त्यावरून आणखी एखाद्या अश्या मुलाखतीची गरज आहे का याचा निर्णय घेतला जाणार आहे असे समजते.

युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोना मधील विज्ञान प्रमुख शास्त्रज्ञ डांटे लॉरेटा या संदर्भात म्हणाले नासाने मिळविलेल्या या यशाचा खूप आनंद झाला आहे. ओसिरीसने बेनूला भेट दिली यावर अजून विश्वास बसत नाही. ओसिरीसने त्याच्यावर सोपविलेली सर्व जबाबदारी यथायोग्य पार पाडली. हे यान २०२३ मध्ये पृथ्वीवर परतणार आहे. गेली दोन वर्षे ते बेनू भोवती चकरा मारत होते.

ग्राउंड कंट्रोल कमांडने आदेश दिल्यावर ते ४.५ तासात बेनुवर पोहोचले. पण या उल्कापिंडाच्या ५१० मीटर अंतरात गुरुत्वाकर्षण नसल्याने ओसिरीस पूर्ण लँड झाले नाही. त्याऐवजी त्याने त्याचा ३.४ मीटर लांबीचा रोबो हात जमिनीवर ठेऊन धुळीचे नमुने गोळा केले. धुळीचे किमान ६० ग्राम नमुने त्याने गोळा केले असतील तर त्या सहाय्याने सौरमंडलाचा अभ्यास करता येणार आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर जीवनाची सुरवात कशी झाली यावर प्रकाश पडू शकणार आहे. उल्कापिंडाची टक्कर बसल्यानेच पृथ्वीवर जीवन सुरु झाले असावे असा दावा पूर्वीपासून अनेक शास्त्रज्ञ करत आहेत.