डीडीएलजे ची २५ वर्षे, पण मराठा मंदिर सुनसान

फोटो साभार यु ट्यूब

आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली मात्र हा चित्रपट आजही जेथे गेली २५ वर्षे दाखविला जात आहे त्या मुंबई सेंट्रल जवळील मराठा मंदिरात मात्र शुकशुकाट अनुभवास आला. या चित्रपटाने सतत २५ वर्षे थियेटर मध्ये मुक्काम ठोकून रेकॉर्ड केले असले तरी आता मुंबईकरासाठी मात्र त्याचे विशेष कौतुक राहिलेले नाही असे दिसून आले.

लंडन मध्ये डीडीएलजे च्या रजत जयंती निमित्तानं शाहरुख आणि काजोल यांचा पुतळा उभारला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड नगरी मुंबईची उदासी ठळकपणे समोर आली आहे. मराठा मंदिरवर या चित्रपटाचा बोर्ड अजून झळकतो आहे आणि त्याचा कितवा आठवडा सुरु आहे याची पाटी संतोष नावाचा कर्मचारी अपडेट करतो. गेली दहा वर्षे संतोष हेच काम करतो आहे.

डीडीएलजे मराठा मंदिर मध्ये मॅटीनी शो म्हणून दाखविला जातो. आजही आठवड्यात कधी कधी १००-२०० प्रेक्षक येतात. आता करोना मुळे थियेटर्स बंद आहेत. या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली तेव्हा शाहरुख आणि काजोल या चित्रपटगृहात उपस्थित राहून प्रेक्षकांना भेटले होते याची आठवण आसपासच्या परिसरातील रहिवासी सांगतात.