ग्राहकांच्या अपमानाची परंपरा पाळणारे रेस्टॉरंट


एखादे रेस्टॉरंट त्याच्या सजावटीसाठी, एखादे तिथे मिळत असलेल्या खास पदार्थांसाठी, एखादे सुंदर लोकेशनसाठी, एखादे मस्त कॉफी आणि सँडविचेस साठी प्रसिद्ध असणे यात नवलाची बाब नाही. मात्र अमेरिकेतील लास वेगास येथे असलेले डिक्स लास्ट रिसॉर्ट मात्र येथे येणार्‍या ग्राहकांचा अपमान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटची ही परंपरा आहे आणि नवलाची बाब अशी की या रेस्टॉरंटची लोकप्रियताही मोठी आहे. खास अपमान करून घेण्यासाठी आणि वेटरच्या शिव्या खाण्यासाठी येथे लोक मोठ्या हौसेने येतात असे समजते.

येथे तुम्ही वेटरला नॅपकीन मागितला तर तो तुमच्या अंगावर नॅपकिन भिरकावून तुमचा अपमान करतो. आत येताच तुमच्या डोक्यावर अवमानास्पद मजकूर लिहिलेली कागदी टोपी घातली जाते. खाण्याच्या पदार्थाची ऑर्डर देण्यास विलंब लावलात तर शिक्षा म्हणून तुम्हाला जेवण दिलेच जात नाही. येथील डिशची नांवेही चमत्कारीक आहेत.

येथे येणारा प्रत्येक ग्राहक या सर्व प्रकारांची मनमुराद मजा लुटतो असे हॉटेल मालकाचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्रस्त असलेले ग्राहक येथे मोंठ्या संख्येने येतात. येथले हलकेफुलके वातावरण त्यांच्यावरचा शारीरिक मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. वेटरच्या अपमानकारक शब्दांवर ग्राहक मनमुराद हसतात आणि स्ट्रेस फ्री होतात. ज्यामुळे त्यांचा मानसिक थकवा दूर होतो. अर्थात ज्यांना चेष्टा समजते आणि चेष्टा केल्याचे वाईट वाटत नाही असेच ग्राहक येथे खरा आनंद मिळवू शकतात.

या हॉटेलात खरच ग्राहक येतात का अशी शंका घेऊ नये. कारण या हॉटेलची लोकप्रियता प्रचंड असून त्यांच्या विविध ठिकाणी १३ शाखा आहेत.

Leave a Comment