नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये पार पडणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा


पुणे – नुकत्याच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून या दोन्ही इयत्तांच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पार पडणार आहेत. यासंदर्भातील माहिती परित्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२० च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागतीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे.

त्यानुसार माध्यमिक शालान्त (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा २० नोव्हेंबर व ५ डिसेंबर २०२०, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) – सर्वसाधारण व द्विलक्षी विषय परीक्षा – २० नोव्हेंबर व १० डिसेंबर २०२०, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा २० नोव्हेंबर व ७ डिसेंबर २०२० रोजी घेतली जाणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दि. १८ नोव्हेंबर ते शनिवार ५ डिसेंबर व इयत्ता १२ वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार १८ नोव्हेंबर ते गुरूवार १० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक २० ऑक्टोबर २० पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.