पेरूच्या वाळवंटात सापडले मांजराचे प्राचीन भव्य चित्र

फोटो साभार सीएनएन

पेरू देशाच्या वाळवंटात पुरातत्त्वशास्त्र तज्ञांना सुमारे २२०० वर्षे जुने, मांजराचे भले मोठे रेखाचित्र सापडले आहे. या चित्राची लांबी १२१ फुट आहे. नाझ्का वाळवंटातील पहाडावर ही आकृती दिसून आल्याचे सीएनएनच्या बातमीत म्हटले गेले आहे. या भागाला नाझ्का लाईन्स असे म्हटले जाते आणि हा सर्व भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला गेला आहे. या भागात यापूर्वी सुद्धा अशी अनेक प्राचीन, भव्य रेखाचित्रे आढळली आहेत. नाझ्का संस्कृतीचे हे देणे असल्याचे मानले जाते.

या पूर्वी या भागात ३०० पेक्षा अधिक भव्य आकृत्या आढळल्या आहेत. त्यांना नाझ्का लाईन्स जियोग्लोफ (जमिनीवरची विशाल रेखाचित्रे) म्हटले जाते. त्यात पशु, ग्रह, माणसाचे तोंड असलेले पशु, दुतोंडी सर्प, व्हेल, पक्षी अश्या अनेक आकृत्या आहेत. पण मांजराचे रेखाचित्र प्रथमच आढळले आहे. पेरू सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात गेले काही आठवडे संरक्षण व सफाईचे काम सुरु असून त्यावेळी मांजराची आकृती दिसून आली आहे.

अलास्का ते अर्जेंटिना हायवेला लागून असलेल्या एका पहाडावर ही आकृती रेखली गेली आहे. गेल्या नोव्हेंबर मध्ये या भागात अशी १४० रेखाचित्रे सापडली होती. ही चित्रे २१०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.