डीडीएलजेची २५ वर्षे, लंडन मध्ये शाहरुख काजोलचा पुतळा उभारला जाणार

लंडनच्या लीसेस्टर स्वायर मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा पुतळा उभा केला जात आहे. निमित्त आहे त्यांच्या तुफान गाजलेल्या चित्रपटाच्या पंचविशीचे. बॉलीवूड सुपरहिट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट रिलीज झाल्याला २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९५ मध्ये या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला होता आणि आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्सशी संबंधित मार्क विलियम्स या संदर्भात मिड डे ला दिलेल्या माहितीत म्हणाले अतिशय यशस्वी ठरलेल्या हिंदी चित्रपटातील कलाकारांचा पुतळा येथे उभारण्याच्या कामाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले याचा मला अभिमान वाटतो. बॉलीवूडच्या जागतिक लोकप्रियतेचे ते प्रतिक ठरावे. दिलवाले मधल्या एका सीनची निवड करून हा पुतळा बनविला आहे.

दिलवाले दुल्हनियाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटाचा बराचसा भाग लंडन, युरोप मध्ये चित्रित झाला होता. या चित्रपटात शाहरुख काजोल सह अमरीश पुरी, अनुपम खेर, सतीश शहा, मंदिरा बेदी, फरीदा जलाल, परमित सेठी यांच्याही भूमिका होत्या.