हिवाळ्यात येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट


नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप अद्याप कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतरही आटोक्यात आणण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी आहे. त्यातच सध्या कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. दरम्यान नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट हिवाळ्यात येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली आहे.

व्ही. के. पॉल यांच्याकडे देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचे नेतृत्त्व आहे. देशात दररोज गेल्या तीन आठवड्यांपासून आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आल्याची माहिती पॉल यांनी दिली.