रक्षकच झाले भक्षक ! ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा तुरुंगात महिलेवर १० दिवस बलात्कार


भोपाळ: एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यावर तुरुंगात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पाच पोलिसांवर खुनाचा आरोप असलेल्या २० वर्षीय महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातील मंगावन शहरात घडली आहे.

पोलिसांनी मे महिन्यात १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. १० ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, विधि अधिकारी आणि दोन वकिलांनी तुरुंगाची पाहणी केली. हा धक्कादायक तेव्हा प्रकार उघडकीस आला. तुरुंगात असलेल्या पीडित महिलेने तिची व्यथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सांगितल्यानंतर या प्रकरणी न्यायाधीशांनी न्यायालयीन चौकशीचे दिले.

या प्रकरणावर भाष्य करताना रेवाचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी वेगळाच दावा केला. संबंधित महिलेने ९ मे ते २१ मे दरम्यान अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. पण तिला आणि तिच्या मैत्रिणीला आम्ही २१ मे रोजी अटक केली. खुनाच्या आरोपाखाली मंगावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघींना ताब्यात घेण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.

१० ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तुरुंगाची पाहणी केली. त्यांच्यासोबत त्यावेळी असलेल्या विधि पथकातील वकील सतीश मिश्रांनी पीडित महिलेकडे एवढे महिने गप्प का राहिलीस, याबद्दल विचारणा केली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी आपली आपबिती वॉर्डनच्या कानावर घातली होती. अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी तुरुंगातच असल्याने याबद्दल भीती वाटत असल्याचे पीडितेने सांगितल्याची माहिती मिश्रांनी दिली.

तुरुंगात घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना देखील खून प्रकरणात गोवण्यात येईल, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. ३ महिन्यांपूर्वी आपल्याला पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला होता, याची माहिती वॉर्डनने दिली. तिचा जबाब अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी नोंदवला. तो जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले.