या देवमाश्याच्या दातांना मिळते लाखोंची किंमत

फोटो साभार वर्ल्ड प्रेस

हस्तीदंत म्हणजे हत्तीचे दात अतिशय मौल्यवान असतात याची कल्पना आपल्याला आहे. दात मिळविण्यासाठी हत्ती मोठ्या प्रमाणावर मारलेही जातात. तसाच प्रकार एका माश्याच्या बाबतीत सुद्धा घडतो याची माहिती फार थोड्या जणांना असेल. हा मासा देवमासा जातीचा असून त्याला स्पर्म व्हेल असे म्हटले जाते. या माश्याचा एक एक दात एक किलोपेक्षा अधिक वजनाचा असतो आणि त्यामुळे या माशांची शिकार फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता हे मासे त्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

या माश्यांचे दात मौल्यवान मानले जातात. ते लाखो रुपयांना विकले जातातच पण त्यामागे अन्य काही मजेदार कारणेही आहेत. फिजी मध्ये हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. तेथे मुलीचा बाप होणाऱ्या जावयाकडे स्पर्म व्हेलचा दात हुंडा म्हणून मागतो. ही फार प्राचीन परंपरा असून त्याला तबूआ असे म्हटले जाते. प्रेम व्यक्त करण्याची ही सर्वात मोठी किंमत मानली जाते. या दातांमध्ये सुपरनॅचरल पॉवर आहे असा येथील लोकांचा समज आहे. हा दात सांभाळून ठेवला तर विवाह दीर्घकाळ टिकून राहतो असे मानले जाते. १८ व्या शतकापासून ही परंपरा पाळली जाते असेही सांगतात.

इतकेच नव्हे तर फिजी मध्ये एखाद्या गटाच्या म्होरक्याला ठार करायचे असेल तर दुसरा गट ठार करणाऱ्या माणसाला सुपारी म्हणून पैसे न देता व्हेलचे दात देतो. विशेष म्हणजे स्पर्म व्हेल हे माश्यांच्या जातीतले सर्वात मोठे मासे आहेत आणि त्याच्या तोंडात दातांच्या २० ते २२ जोड्या असतात. हे दात १० ते २० सेमी लांब आणि वजनाला किमान १ किलो असतात. या माश्यांची शिकार फार मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे हे मासे दुर्लभ झाले आहेत. परिणामी त्यांच्या दातांची मागणी आणखी वाढली आहे. अख्खा दात नाही तर दाताचा तुकडा सुद्धा लाखो रुपयात विकला जातो. सध्या जगात या जातीचे फक्त ३ लाख मासे शिल्लक आहेत असेही सांगितले जाते.