मिशीसाठी वाट्टेल ते

पुरूषांसाठी मिशी हे मर्दानीपणाचे लक्षण मानले जाते. मात्र ही मिशी जिवावरच बेतत असेल तर? पाकिस्तानी उद्योगपती मलिक अमीर मोहम्मद आफ्रिदी हे असेच मिशी जीवावर बेतलेले गृहस्थ आहेत. मात्र प्राण जाये पर वचन न जाये या उक्तीप्रमाणे प्राण जाए पर मिशी न जाए असा त्यांचा निर्धार आहे. या मिशीसाठी त्यांनी काय काय सोसलेय हे पाहिले तर थक्क व्हायला होते.

मलिक यांना या मिशीमुळे कुटुंबापासून दूर राहावे लागते आहेच पण जीवे मारण्याच्या धमक्याही येत आहेत. या मिशीपाई त्यांचे अपहरण झाले व कांही काळ त्यांना गुहेत एकांतवासातही काढावा लागला. मलिक यांची मिशी ७६ सेंमी लांबीची असून तिची देखभाल करण्यासाठी त्यांना दररोज अर्धा तास वेळ द्यावा लागतो.२००९ साली या मिशीमुळेच तालिबानशी संबंध असलेल्या लष्कर इ इस्लाम या संघटनेने त्यांचे अपहरण केले होते. गुहेत कांही काळ एकांतवासात काढल्यावर आणि मिश्या कापल्यानंतरच त्यांची सुटका झाली. मिशी वाढविणे हे इस्लामविरोधात असल्याने त्यांना हा त्रास सोसावा लागला. मात्र मलिक यांनी सुटका झाल्यानंतर पुन्हा मिशी वाढविली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या आहेत.

मलिक सांगतात पूर्वी मला कोणीच विशेष ओळखत नव्हते. मात्र मिशी वाढविल्यावर मी एकदम फेमस झालो. मी लोकांच्या नजरेत भरतोय याचा मला अभिमान वाटतोय आणि आनंदही होतोय. पूर्वी मिशी वाढविल्याबद्दल माझ्याकडून दरमहिना ५०० डॉलर्सची मागणी दहशतवाद्यांनी केली होंती. मात्र नंतर मला पळवून नेले गेले. आत्ताही कुटुंबाला इजा होऊ नये म्हणून मी त्यांच्यापासून दूर राहतोय. मी कुटुंबापासून दूर राहू शकतो. पाकिस्तान सोडू शकतो पण मिशाचा त्याग करू शकत नाही. कुटुंबासोबत राहता यावे यासाठी मलिक अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, दुबई असा कुठेही राजकीय आश्रय मिळतोय का यासाठी प्रयत्नशील आहेत.

मलिक यांची मिशी ७६ सेंमी लांब असली तरी सर्वात लांब मिशीचा विक्रम मात्र भारतीयाच्या नावावर असून त्यांचे नांव आहे रामसिंग चौहान. चौहान यांची मिशी तब्बल १४ फूट लांबीची असून हा जागतिक विक्रम आहे. ही मिशी मेनटेन करण्यासाठी चौहान यांना महिना ९१०८ रूपये खर्च येतो असे समजते.

Leave a Comment