जिओ ३ हजारात देणार ५ जी स्मार्टफोन

फोटो साभार युट्यूब

रिलायंस जिओ पाच हजारापेक्षा कमी किमतीत ५ जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून जशी फोनची मागणी वाढेल तसा हा फोन २५०० ते ३ हजार रुपयात युजर्स साठी उपलब्ध केला जाणार असल्याचे समजते. रिलायंस मधील अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मात्र कंपनीने कोणताही अधिकृत खुलासा त्याबाबत केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जिओची नजर सध्या टू जी चा वापर करत असलेल्या २० ते ३० कोटी युजर्सवर आहे. त्यामुळे सुरवातीला ५ हजार पेक्षा कमी किमतीत ५ जी स्मार्टफोन देण्याची आणि युजर्स संख्या वाढल्यावर तो आणखी कमी किमतीत देण्याची योजना रिलायंस जिओने आखली आहे. सध्या भारतीय बाजारात ५ जी स्मार्टफोनची प्राईज रेंज २७ हजार रुपयापासून सुरु आहे.

भारतीय बाजारात पहिला फोर जी फोन रिलायंस जिओने लाँच केला होता. जिओ फोन नावाने बाजारात आलेला हा फोन १५०० रुपये रीफंडेबल डीपॉझीट देणाऱ्या ग्राहकांना मोफत दिला जात होता. कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ३३,७३७ कोटी घेऊन जिओ मधला ७.७ टक्के हिस्सा गुगल ला विकण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी भारताला टूजी मधून मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

सध्या भारतात टूजीचे ३५ कोटी युजर्स आहेत. गुगल सह सहकार्य करून स्वस्त अँड्राईड फोन आणायचा प्रयत्न सुरु असून जिओ ५ जी नेटवर्क उपकरणेही उत्पादित करत आहे. ही उपकरणे निर्यात सुद्धा केली जाणार आहेत. ५ जी टेस्टिंग साठी जिओने स्पेक्ट्रमची मागणी केंद्र सरकार कडे केली आहे असेही समजते.

————–