आयपीएल- एका सामन्यात प्रथमच दोन सुपरओव्हर, असे आहेत नियम

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात दोन सुपरओव्हर टाकल्या जाण्याची घटना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या गेलेल्या मुंबई आणि पंजाब या टीम मध्ये घडली. त्यात पंजाबने मुंबई इंडियन्सचा  पराभव केला. यात मुंबई इंडीयन्सने ६ विकेटच्या बदल्यात १७६ धावा केल्या होत्या आणि पंजाबनेही ६ विकेटच्या बदल्यात १७६ धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला होता.

सामना पूर्ण निकाली व्हावा म्हणून सुपरओव्हर खेळली गेली त्यातही दोन्ही टीमनी ५-५ धावा केल्या. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवली गेली. त्यात मात्र मुंबई इंडीयन्सनी एक विकेटच्या बदल्यात ११ धावा केल्या पण त्याला उत्तर देताना पंजाब इलेव्हनच्या क्रिस गेलने छक्का व दोन चौकार लगावून १५ धावा मिळविल्या आणि सामना जिंकला. अर्थात दुसरी सुपर ओव्हर खेळविण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे त्याबाबतच्या नियमाबद्दल खेळाडू सुद्धा गोंधळात होते.

सुपरओव्हर बाबत आयपीएल मध्ये काही नियम आहेत ते असे,

जेव्हा सुपर ओव्हर खेळविली जाते आणि दुसरी सुपर ओव्हर खेळवावी लागण्याची वेळ येते तेव्हा दोन ओवर मध्ये ५ मिनिटापेक्षा जादा ब्रेक घेता येत नाही. पहिल्या सुपर ओव्हर मध्ये ज्यांनी गोलंदाजी केली ते दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये प्रथम फलंदाजी करतात. ज्या गोलंदाजाने ओव्हर टाकली असेल तो दुसरी सुपर ओव्हर टाकू शकत नाही. तसेच पहिल्या सुपरओव्हर साठी जो चेंडू निवडला असेल तोच दुसऱ्या सुपर ओव्हर साठी वापरावा लागतो. सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळविता येतात.