अनेक रहस्ये उदरात लपविलेला गोवळकोंडा

करोनाचा जोर कमी होऊन अनलॉक प्रक्रिया देशभरात जोरात सुरु झाली आहे. त्यामुळे आता घरात बसून कंटाळलेले अनेक, पर्यटन करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक राज्यात गड किल्ले आहेत त्यातील काही तर प्राचीन आहेत. त्यातील एक आहे हैद्राबाद जवळचा गोवळकोंडा. पर्यटन स्थळ म्हणून हा किल्ला प्रथमपासून लोकप्रिय आहे. हा किल्ला अनेक रहस्ये त्याच्या उदरात लपवून बसलेला आहे. देशातील सर्वात मोठे मानव निर्मित सरोवर हुसेन सागर पासून हा किल्ला ९ किमी अंतरावर आहे.

हा किल्ला संरक्षित स्मारक आहे. या किल्ल्याचे बांधकाम १६००च्या दशकात पूर्ण झाले मात्र तो बांधायची सुरवात १३ व्या शतकात झाली होती. काकतीय राजवंशाने हा किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. त्याची कथा अशी सांगतात की एका गुराख्याला या पहाडावर एक मूर्ती सापडली. ही गोष्ट काकतीय राजाला कळली तेव्हा त्याने ती जागा पवित्र मानून चारी बाजूनी मातीचा किल्ला बांधला. ४०० फुट उंच पहाडावर असलेल्या या किल्लावर नंतर बहामनी, कुतुबशाह, मुघल असे अनेकांनी राज्य केले. अनेक युद्ध्ये या किल्ल्याने पाहिली आहेत.

या किल्ल्याला ८ दरवाजे आणि ८७ गढ्या आहेत. मुख्य दरवाजा फतेह दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरबार हॉल पाहण्यासाठी १ हजार पायऱ्या चढून जावे लागते. गडाच्या तळातून टाळी वाजवली तर त्याचा आवाज सर्व गडावर घुमतो. येथे खापरापासून बनविलेले पाण्याचे पाईप पाहायला मिळतात. किल्ल्यात एक गुप्त भुयार असून ते राजपरिवाराला आणीबाणीत सुखरूप गडाबाहेर पडता यावे यासाठी बांधले गेले होते.

जगप्रसिध्द गोवळकोंडा हिऱ्याची खाण येथे असून या खाणीतून कोहिनूर, होप डायमंड, दरिया ए दस्तूर असे अनेक मौल्यवान हिरे मिळाले आहेत.