टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’ला रसद पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी


मुंबई : मुंबई पोलिसांनी वादग्रस्त रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन स्थानिक चॅनेल्सनी जाहिराती मिळविण्यासाठी टीआरपी रॅकेटमधून कोट्यवधीचा महसूल जमविल्याचे उघडकीस आणल्यानंतर रिपब्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी व इतरांची या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) विरार येथून अटक केली होती.

दरम्यान, आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असून मिश्रा याच्या अटकेनंतर पोलिसांकडून आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.